वाशिम : वाशिममधून (Washim News) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये वाशिमच्या अनसिंग परिसरातील रहिवासी असलेल्या सलमान शेख या 27 वर्षीय व्यक्तीची हत्या करून त्याचा मृतदेह गोणीमधून भरून फेकून दिल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ही हत्या नेमकी कोणत्या कारणातून करण्यात आली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.
काय घडले नेमके?
अनसिंग येथील सलमान शेख हा कालपासून बेपत्ता होता. त्याचा शोध नातेवाईक घेत असतांना आज त्याचा मृतदेह वाशिम – पुसद मार्गावरील उडदी घाटाजवळ आढळून आला. सलमान शेखची काल रात्री हत्या करून त्याचा मृतदेह रेशनचं धान्य नेणाऱ्या एका मिनी ट्रकमध्ये भरून तो उडदी घाटात फेकल्याची माहिती समोर आली आहे. या हत्या प्रकरणात वापरलेलं वाहन पोलिसांनी जप्त केलं आहे. या हत्या प्रकरणातील संशयित आरोपींचा स्थानिक गुन्हे शाखेकडून शोध सुरू आहे.
सलमान शेखची हत्या रेशन तांदळाच्या तस्करीतुन झाल्याची प्राथमिकदृष्ट्या व्यक्त केली जात आहे. यातील इतर रेशन तस्करांचा शोध गुन्हे शाखा घेत आहे. वाशिम जिल्ह्यात रेशन तांदूळ आणि गव्हाची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असून, यावर अंकुश घालण्यात अद्याप पोलिसांना यश आलेले नाही. या हत्याप्रकरणातील आरोपींचा पोलिसांनी लवकरात लवकर शोध घेऊन, त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी मृत सलमानच्या कुटुंबियांकडून केली जात आहे.