National Crime Records Bureau : महिलांवर सर्वाधिक लैंगिक अत्याचार राजस्थानात ; महाराष्ट्र 4 क्रमांकावर 

204 0

मुंबई : देशात महिलांवरील लैंगिक अत्याचारांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. यात राजस्थान प्रथम क्रमांकावर तर महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या (एनसीआरबी) अहवालातून ही माहिती समोर आली असून देशातील महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

इतर गुन्हयांमध्ये महिलांवरील अन्याय-अत्याचारांच्या बाबतीत सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद उत्तर प्रदेशात झाली आहे. वर्ष २०२० मध्ये उत्तर प्रदेशात ४९ हजार ३८५ गुन्हे दाखल झाले. या क्रमात पश्चिम बंगाल दुसऱ्या स्थानावर असून तेथे ३६ हजार ४३९ गुन्हे नोंद आहेत. तिसऱ्या स्थानावर राजस्थान आहे.

अशा गुन्ह्यांमधील आरोपींमध्ये कुटुंबातील सदस्य, पती, जवळचे नातेवाईक, शेजारी, नोकर, मित्र, प्रियकर आणि ओळखीच्या व्यक्तींचा मोठय़ा प्रमाणात समावेश आहे. अनोळखी व्यक्तीने महिलांवर केलेल्या लैंगिक अत्याचाराचे प्रमाण अत्यल्प असून सर्वाधिक आरोपी हे संबंधांतील आहेत. त्यामुळे अनेक प्रकरणांमध्ये न्यायालयातून शिक्षेचे प्रमाण कमी होत असल्याचेही निदर्शनास आले आहे.

राजस्थानात महिलांवर सर्वाधिक लैंगिक अत्याचार ; महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर; राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाची आकडेवारी

मुंबई, नागपूर, पुण्याचाही समावेश

देशातील १९ महानगरांत महिलांविरुद्ध घडलेल्या अन्याय-अत्याचारांसंदर्भात दाखल गुन्ह्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात मुंबई, नागपूर, पुणे शहराचा समावेश आहे. देशात महिलांसंदर्भात दाखल झालेल्या गुन्ह्यांत मुंबई शहर पहिल्या पाचमध्ये आहे. मुंबईत साडेचार हजारांवर गुन्ह्यांची तर नागपूरमध्ये ९२० गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

कारणे : 

उत्तर प्रदेश आणि राजस्थान या दोन्ही राज्यांत महिला शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. तसेच महिलांना राजकीय, सामाजिक, आर्थिक स्वातंत्र्य नाही. दोन्ही राज्यांत महिलांना दुय्यम स्थान देण्यात येते. त्यामुळे चूल आणि मूल ही परंपरा अद्यापही या राज्यांमध्ये कायम आहे. तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यात पोलीस अपयशी ठरताना दिसत आहेत.

Share This News
error: Content is protected !!