- मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात एक मोठा ट्विस्ट आला असून केज पोलिस स्टेशनमध्ये वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले यांच्याविरुद्ध केज पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मस्साजोग येथील अवादा कंपनीचे प्रकल्प अधिकारी सुनील केदु शिंदे यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, 6 डिसेंबर 2024 रोजी सुदर्शन घुले व त्यांचे इतर सहकारी अवादा कंपनीच्या मस्साजोग येथील प्रकल्पाच्या गोडाऊनमध्ये जबरदस्तीने प्रवेश केला होता. इतकंच नाही तर गेटवरील कामगारांना त्यांनी धमकी देऊन मारहाण देखील केली होती. त्यावेळी कंपनीचे शिवाजी थोपटे यांनी सुदर्शन घुले व इतर लोकांविरुद्ध पोलिस ठाणे केज पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनील केदु शिंदे हे अवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत प्रकल्प अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील विविध ठिकाणी पवन ऊर्जा प्रकल्पाचे मांडणी व उभारणीचे काम शिंदे यांच्या देखरेखीत झाले आहेत.सुनील शिंदे यांच्यासोबत अनेक अधिकारी येथे काम पाहातात. सुनील शिंदे यांनी सांगितलं, की शिवाजी नाना थोपटे हे जमीन अधिग्रहण विभागाचे काम पाहतात. पवन ऊर्जा प्रकल्पाचे प्रमुख म्हणून सतिश कुमार हे महाराष्ट्रात काम पाहतात. सुनील शिंदे हे 29 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास ते अवादा एनर्जी प्रकल्पाच्या कार्यालयात हजर असताना त्यांच्या मोबाईलवर विष्णु चाटे यांचा कॉल आला होता. वाल्मिक आण्णा बोलणार आहेत असं विष्णु चाटे म्हणाले. अरे ते काम बंद करा,ज्या परिस्थीतीमध्ये सुदर्शनने सांगीतले आहे, त्या परिस्थीतीत काम बंद करा, अन्यथा त्याचे परिणाम गंभीर होतील. काम सुरू ठेवलं तर याद राखा, अशा शब्दांत धमकी देण्यात आली. सुनील शिंदे आणि शिवाजी थोपटे असे कार्यालयात हजर असताना दुपारी अडीच वाजेच्या सुमारास सुदर्शन घुले (रा.टाकळी) हे मसाजोग येथील प्रकल्पाचे ठिकाणी आले. त्यांनी पुन्हा काम बंद करा. अन्यथा जी मागणी यापूर्वी केलेली आहे त्याची पूर्तता करा, असे सांगितले. काही दिवसापूर्वी शिवाजी थोपटे यांना वाल्मिक आण्णा कराड यांनी त्यांचे परळी येथील कार्यालयात बोलावून अवादा कंपनीचे केज तालुक्यातील सर्व काम बंद करा, अन्यथा काम चालु ठेवायचे असेल तर दोन कोटी रुपये द्या, असे सांगितले होते. त्यानंतर वेळोवेळी विविध लोकांचे मोबाईल वरुन प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रित्या प्रकल्पाचे काम बंद न ठेवल्यास मारहाण करण्याची व जिवे ठार मारण्याची धम देखील दिली हेती. यापूर्वी 28 में 2024 रोजी 11 वाजेच्या सुमारास याच कारणावरुन माझे आपहरण केले होते, असेही सुनील शिंदे यांनी पोलिसांना माहिती दिली आहे.