Latur News

Latur News : लातूर हादरलं ! पैशापायी नवऱ्याने गर्भवती पत्नीलाच संपवले

1266 0

लातूर : लातूरमधून (Latur News) पती – पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये पतीने आपल्या पत्नीची निर्घृणपणे हत्या केली आहे. धक्कादायक म्हणजे मृत महिला दोन महिन्याची गर्भवती होती. आरोपी पतीने पत्नी झोपेत असताना कुऱ्हाडीने घाव घालून तिची निर्घृणपणे हत्या केली. ही घटना लातूर तालुक्यातील कसारगाव येथे घडली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
जना सुनील घावीट असे मृत विवाहित महिलेचे नाव आहे. जोशी समाजातील गावोगावी फिरून भिक्षा मागून खाणारे प्रभाकर भोसले दिव्यांग. पदरी चार लेकरं आणि अशा परिस्थितीत पती संसाराचा गाडा ओढणार कसा म्हणून पत्नीनेही गावोगावी फिरून आभूषण विक्रीला सुरुवात केली. कसेबसे थोडे पैसे जमवून ऐपतीप्रमाणे खर्च करून लातूर जिल्ह्यातील कासारगाव येथील सुनील घावीट यांच्याशी मे २०२३ मध्ये लेकीचा विवाह लावून दिला. सुखी संसाराची स्वप्न पाहत हळव्या मनाची जना घावीट कुटुंबात आली. गोड स्वप्नात महिना लोटला अन सेंट्रिंगच काम करणाऱ्या नवऱ्याने आपले रंग दाखवायला सुरुवात केली. “माहेरहून एक लाख रुपये घेऊन ये”, म्हणून कुरबुर करू लागला. सासू सासऱ्यांनीदेखील पैशांसाठी तगादा लावला. आई बापाची परिस्थिती गरीब म्हणून जना सगळं सहन करू लागली.

मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. आरोपी पतीने आपल्या आई – वडिलांच्या मदतीने पत्नी जनाची निर्घृणपणे हत्या केली. ही घटना जनाचे वडील प्रभाकर भोसले यांना समजताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी लगेच कासारगावला धाव घेतली. पोटच्या पोरीचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह पाहून त्यांनी हंबरडा फोडला. यानंतर त्यांनी लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात जनाचे पती, सासू, सासरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी या तिघांना अटक केली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!