कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये (Kolhapur) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये जनावरांसाठी कडबा कुट्टी मशीनने वैरण बारीक करत असताना मशीनचा शॉक (Shock) लागून एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. ही हृदयद्रावक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील कावणेमध्ये मंगळवारच्या सुमारास घडली आहे. शिवदत्त उर्फ सोन्या मारूती पाटील (वय 28) (Sonya Maruti Patil) असे या अपघातात मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. शिवदत्त हा पैलवान होता. त्याच्या मृत्यूने परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त केली जात आहे. शिवदत्तच्या माघारी आई, वडील, दोन बहिणी असा परिवार आहे.
शिवदत्त हा पैलवान होता. त्याचे वजन 107 किलो होते. धिप्पाड शरीरयष्टी होती. त्याने पैलवानकी करत आपले पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते. शिवदत्तचे वडील ‘गोकुळ’मध्ये प्रशिक्षण वर्गाचे अधिकारी आहेत. शिवदत्तने कुस्तीमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. शिवदत्त हा पैलवानकी करत घरची जनावरे सांभाळून दुग्ध व्यवसाय करत होता.
घटनेच्या वेळी तो जनावरांना कडबा चारण्यासाठी कडबा कुट्टीत वैरण बारीक करत होता. मात्र, मंगळवारी त्याचे कडबा कुट्टीचे काम सुरू असताना अचानक त्याला शॉक लागला. या दुर्घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला. बराच वेळ झाला तरीही शिवदत्त घरी न आल्याने त्याच्या आईने त्याला फोन केला. मात्र, तो फोन उचलत नसल्याने आईने गोठ्याकडे धाव घेतली. तेव्हा शिवदत्त कडबा कुट्टी मशीनच्या बाजूस पडलेला दिसला. यानंतर आरडाओरडा करताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर त्यांनी त्याला रुग्णालयात दाखल केले मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.