कोल्हापूर : आजकाल तरुणाईमध्ये आत्महत्येचे प्रमाण खूप वाढले आहे. थोडे काही बिनसले तरी नैराश्यात जाऊन आत्महत्या करत असतात. अशीच आत्महत्येची घटना कोल्हापूरमध्ये घडली आहे. यामध्ये एका तरुणाने व्हाॅट्सअॅपला स्वत:चा फोटो ठेवून त्याला श्रद्धांजली वाहत आत्महत्या केली आहे. हि धक्कादायक घटना कोल्हापुरमधील कळंब्यात घडली आहे. अवधूत अजित डाकवे (वय 24, रा. डाकवे गल्ली, मंगळवार पेठ, सध्या कळंबा) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. वडील लहानपणीच वारल्याने तो आपल्या आईसोबत या ठिकाणी राहत होता.
मृत अवधूत आणि त्याची आई हे दोघेही एका खासगी दवाखान्यात नोकरी करत होते. घटनेच्या दिवशी नेहमीप्रमाणे दोघेही दवाखान्यातुन बाहेर पडले. यानंतर आई जेवण करण्यासाठी स्वयंपाक घरात गेली. तर अवधूत दुसऱ्या खोलीत गेला. यानंतर अवधूतने मोबाईलवर स्वतःचा फोटो स्टेटसवर ठेवून स्वतःलाच भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. त्याचा हा स्टेटस पाहून मित्रांनी आणि नातेवाईकांनी त्याला कॉल करण्याचा प्रयत्न केला पण त्याचा फोन स्विच ऑफ लागला. यानंतर अवधूतने स्टेटस अपडेट केल्यानंतर लोखंडी पाईपला टॉवेलने गळफास घेऊन आत्महत्या केली.
यानंतर अवधूतला तातडीने सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले मात्र त्या अगोदरच त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. आपल्या एकुलत्या एका मुलाने असे पाऊल उचलल्यामुळे अवधूतच्या आईला याचा मोठा धक्का बसला आहे. मात्र त्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.