मुंबई : काही दिवसांपूर्वी के-पॉप स्टार गायक मूनबिन (K-pop star singer Moonbin) याने आत्महत्या करून आपल्या आयुष्याचा शेवट केला होता. ही घटना ताजी असताना आता के-पॉप स्टार आणि प्रसिद्ध कोरियन गायिका हेसू हिने आत्महत्या केल्याने कोरियन के–पॉप बँडच्या (Korean K–pop band) चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. एका हॉटेलमध्ये हेसूचा (haesoo) मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आला. तिच्या निधनामुळे जगभरातील तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
प्रसिद्ध कोरियन गायिका हेसूचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र ती त्या कार्यक्रमासाठी आली नाही. त्यानंतर आयोजिकांनी ती हरवल्याची तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास केला असता शनिवारी 13 मे रोजी हेसूचा मृतदेह (Suicide) एका हॉटेलच्या रुममध्ये संशयास्पदरित्या आढळून आला.
यावेळी पोलिसांना तिच्या रुममधून एक सुसाईड नोट (Suicide Note) सापडली. त्यामुळे पोलिसांकडून प्रथमदर्शनी हेसूने आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. मात्र पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. तसेच तिने वयाच्या 29 व्या वर्षी इतके टोकाचे पाऊल का उचलले हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.
कोण आहे कोरियन गायिका हेसू?
हेसू ही दक्षिण कोरियातील (South Korea) एक लोकप्रिय गायक होती. ती अनेक कार्यक्रम करायची. दक्षिण कोरियामध्ये तिचा मोठ्या प्रमाणात चाहता वर्ग होता. हेसूच्या मृत्यूने तिच्या चाहत्यांना आणि कलाकारांना मोठा धक्का बसला आहे. हेसूचा जन्म 1193 मध्ये झाला. तिने 2019 मध्ये आपल्या करिअरला सुरुवात केली. ‘My Life, Me’ असे तिच्या पहिल्या अल्बमचे नाव होते. पण ‘The Trot Show’ मुळे ती अधिक लोकप्रिय झाली होती. तिचे चाहते फक्त दक्षिण कोरियासोबत जगभर होते.