Jalna Bribe News

Jalna Bribe News : तक्रारदाराने लढवली शक्कल ! लाच घेणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला आणलं गोत्यात

853 0

जालना : हल्ली छोट्या मोठ्या कामासाठी लोकांकडून भरमसाठ लाच (Jalna Bribe News) घेतली जाते. मग ते सरकारी ऑफिस असो वा खाजगी. काही लोकदेखील आपले काम लवकर होण्यासाठी लाच (Jalna Bribe News) देत असतात. अशीच एक घटना जालनामध्ये घडली आहे. यामध्ये जमिनीच्या वादाबाबात केलेल्या अर्जाची चौकशी करुन तक्रारदाराच्या बाजूने मदत करण्यासाठी जालन्यातील पोलिसाने लाच मागितल्याची घटना समोर आली आहे. अंबड पोलिस ठाण्याचा पोलीस उपनिरीक्षक योगेश चव्हाण असे लाच घेणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. त्यांनी 30 हजार रुपयांची लाच मागितली होती.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
तक्रारदार यांच्या मालकीची गट क्रमांक 718 शिवार, निहालसिंग वाडी येथे शेती आहे. या ठिकाणची 5 एकर 29 गुंठे जमीन त्यांनी हारणे यांना पाच लाख रुपये देऊन इसार पावती करून दिली होती. पण या जमिनीचा वाद विवाद होऊन पोस्टे अंबड येथे अर्ज दाखल करण्यात आला होता. त्या अर्जाची चौकशी करून तक्रारदार यांच्या बाजूने मदत करून देण्यासाठी आरोपी पोलीस उपनिरीक्षक योगेश हरी चव्हाण, नेमणूक जामखेड बीट ता. अंबड यांनी तक्रारदार यांच्याकडे ५० हजारांची लाच मागितली होती. पण तक्रारदार लाच देण्याच्या या प्रकाराबद्दल नाराज होते. लाच दिली नसल्याने काम होईना. त्यामुळे तक्रारदार त्रस्त झाले होते.

यानंतर तक्रारदाराने आपली चाल खेळली. त्यांनी पोलिस उपनिरीक्षकाशी तडजोडीचे नाटक केले आणि तडक लाचलुचपत खात्याला तक्रार दिली. तडजोडी अंती 30 हजार रुपये देण्याचे ठरले होते. पोलीस उपनिरीक्षक चव्हाण यांनी मित्रामार्फत आधीच 10 हजार रुपये 17 ऑगस्ट रोजी स्वीकारले होते, पण उर्वरित पैशांच्या मागणीसाठी चव्हाण यांनी तगादा लावला होता. यानंतर तक्रारदाराच्या अर्जावरुन औरंगाबाद येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक फुला यांनी सापळा लावला, आणि या सापळ्यात पोलीस निरीक्षक चव्हाण अलगद अडकले. ही कारवाई पो.हे.कॉ. शिरीष वाघ, पो.ना, राजेंद्र सिनकर, पो.शि.चांगदेव बागुल यांच्या पथकाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे व पोलीस उप अधीक्षक राजीव तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली केली.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!