drowning hands

पोटच्या मुलाला वाचवण्याच्या नादात पाण्यात बुडून मायालेकरांचा दुर्दैवी मृत्यू

1242 0

जालना : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये पाण्यात बुडून मायालेकरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गुरुवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास हि घटना घडली आहे. मुलाचा मृतदेह सराटी शिवारात डाव्या कालव्यात आढळला. तर आईचा मृतदेह अद्याप आढळला नसून त्याचा शोध घेतला जात आहे.

काय घडले नेमके?
सार्थक रवींद्र गारुळे असे मृत पावलेल्या चिमुकल्याचे नाव आहे. तर वंदना गारुळे असे मृत पावलेल्या आईचे नाव आहे. घटनेच्या वेळी सार्थक आपल्या आईसोबत डाव्या कालव्यात धुणे धुण्यासाठी गेला होता. यादरम्यान सार्थकचा अचानक पाय घसरला आणि तो कालव्यात पडला. यानंतर आपला पोटचा मुलगा पाण्यात बुडत असल्याचे पाहून आई वंदना यांनी मुलाला वाचवण्यासाठी तातडीने पाण्यात उडी घेतली. मात्र पाणी अधिक खोल असल्यामुळे या मायालेकरांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

मृत सार्थकचा मृतदेह गुरुवारी सकाळी सात वाजता सराटी शिवारातील पुलाजवळ आढळून आला तर आई वंदना यांचा मृतदेह अद्याप मिळालेला नाही. वंदना यांचे नातेवाईक आणि गावकरी त्यांच्या मृतदेहाचा शोध घेत आहेत. सार्थकचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपासाला सुरुवात करण्यात आली आहे.

Share This News
error: Content is protected !!