जालना : जालना जिल्ह्यातून (Jalna Crime) एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये जाफराबाद तालुक्यातील म्हसरूळ येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये जादूटोणा करत असल्याच्या संशयावरून दोघांनी एका वृद्ध व्यक्तीच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याची हत्या केली. यानंतर गंभीर जखमी झालेल्या वृद्धाला उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. श्रीरंग हरीबा शेजूळ (वय 85 वर्षे, म्हसरूळ, ता.जाफराबाद) असे मृत वृद्धाचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून यामध्ये एकाला अटकसुद्धा करण्यात आली आहे.
काय घडले नेमके?
या घटनेसंदर्भात उत्तम श्रीरंग शेजूळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचे वडील श्रीरंग शेजूळ नेहमीप्रमाणे 1 सप्टेंबरला रात्रीच्या सुमारास आपल्या घरासमोरील अंगणात झोपले होते. दरम्यान यावेळी उत्तम शेजूळ हे गावातील सांस्कृतिक सभागृहात झोपण्यासाठी गेलो होते. मात्र, रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास त्यांना आपल्या वडिलांच्या ओरडण्याचा आवाज आला. त्यामुळे त्यांनी आपल्या चुलतभावाला सोबत घेऊन वडिलांकडे धाव घेतली. मात्र, यावेळी श्रीरंग शेजूळ यांच्या अंगावर कसलेतरी द्रव टाकलेले त्यांना दिसले. अंग भाजत असल्याने श्रीरंग शेजूळ ओरडत होते. आजूबाजूला पाहिले असता कुणीच दिसून आले नाही. त्रास अधिक होत असल्याने उत्तम शेजूळ यांनी आपल्या वडिलांना सामान्य रुग्णालयात दाखल केले. तसेच अधिक उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात भरती केले. मात्र त्या ठिकणी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
यानंतर पोलिसांनी वेगाने तपास करत संशयित नंदू किशोर शेजूळ याला ताब्यात घेतले असून, त्याच्या घरातून अॅसिड जप्त केले आहे. तर त्याच्या विरोधात जाफराबाद पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.