पुणे शहर आणि पुण्यातील वाढती गुन्हेगारी हा सर्वसामान्य पुणेकरांच्या आणि पुणे पोलिसांच्या चिंतेचा विषय बनला आहे. त्यातच एका तरुणाने चक्क हवेत गोळीबार (Pune firing) करून दहशत वाजवण्याचा प्रयत्न केल्याची घटना पुण्यात घडली आहे. त्यातच त्याने गोळीबार करण्यामागचं कारण हे सर्वांनाच आश्चर्यचकित करणारं आहे. ही घटना पुण्यातील वाघोली (wagholi) परिसरात घडली असून या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.
गोळीबार कशासाठी ?
मिळालेल्या माहितीनुसार, विशाल कोलते असं गोळीबार करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास विशालचा मित्र संदीप हरगुडे याला व्यसनमुक्ती केंद्रात नेण्यासाठी एक रुग्णवाहिका आली होती. मात्र आपल्या जवळच्या मित्राला व्यसनमुक्ती केंद्रात नेण्यासाठी विशाल विरोध करत होता. असं असूनही व्यसनमुक्ती केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी संदीपला जबरदस्ती रुग्णवाहिकेत बसवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी राग अनावर न झाल्याने विशालने थेट हवेत गोळी झाडली. त्याच्याकडे असलेल्या परवानाधारक पिस्तुलातून ही गोळी त्याने फायर केली.
विशालने गोळी झाडताच परिसरात एकच खळबळ उडाली. एवढ्यावरच न थांबता त्याने मोठ्या दगडाने रुग्णवाहिकेच्या काचाही फोडल्या. विशालने केलेल्या या राड्यानंतर अखेर संदीपला रुग्णवाहिकेतून खाली उतरवण्यात आलं.
गुन्हा दाखल
या घटनेनंतर परिसरात दहशत उडाल्याने स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलीस काही वेळातच घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपी विशाल कोलते याला ताब्यात घेतलं. दरम्यान, याप्रकरणी आता पोलिसांनी विशाल कोलते याला ताब्यात घेतलं असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.