बदलापूरच्या शाळेत अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करण्यात आला आहे.
तळोजा कारागृहातून रिमांडसाठी नेत असताना पोलिसांच्या जीपमध्ये असताना अक्षयने पोलिसांकडे असलेली सर्व्हिस रिव्हॉल्वर खेचून घेतली आणि पोलिसांवरच तीन गोळ्या फायर केल्या, यातली एक गोळी एपीआय निलेश मोरे यांच्या पायाला लागली. यानंतर स्वसंरक्षणासाठी पोलीस निरिक्षक संजय शिंदे यांनी अक्षयवर गोळी झाडली, यामध्ये अक्षयचा मृत्यू झाला.अक्षय शिंदेच्या मृत्यूनंतर शरद पवारांनी गृहविभागावरच संशय व्यक्त केला आहे.
‘बदलापूर येथे दोन चिमुरड्यांवर झालेल्या अन्यायाला न्याय मिळण्यासाठी कायद्याच्या योग्य चौकटीतून फाशी झालीच पाहीजे होती. परंतू या घटनेतील मुख्य आरोपीला स्थलांतरीत करताना गृह विभागाने दाखवलेला हलगर्जीपणा संशयास्पद आहे. भविष्यात अशा निंदनीय कृत्याची कल्पनाही कोणाच्या मनाला शिवणार नाही यासाठी कायद्याचा धाक घालण्यात शासन दुर्बल ठरलंय, असे भासते. या घटनेच्या सखोल चौकशीतून वस्तूस्थिती समोर येणं अपेक्षित आहे’, असं शरद पवार म्हणाले आहेत.
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांवर पलटवार केला आहे. ‘सुरूवातीला विरोधक फाशीची मागणी करत होते, आता आरोपीची बाजू घेत असतील तर हे दुर्दैवी आहे. अशाप्रकारे आरोपीची बाजू घेणं निंदनीय आहे, त्याचा निषेध करावा तेवढं थोडंच आहे. पोलीस जखमी आहेत, त्याचं काही देणंघेणं विरोधी पक्षाला नाही. पोलीस कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आपला जीव धोक्यात घालतात.सणावाराला रस्त्यात उन्हात, पावसात उभे असतात. कुटुंबापासून लांब राहतात, अशा पोलिसांबद्दल आक्षेप घेणं, प्रश्नचिन्ह निर्माण करणं दुर्दैवी आहे. जी काही कारवाई केली त्याचा तपास होईल, खऱ्या गोष्टी समोर येतील. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे’, असं प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे.