पुण्यातली अपघातांची मालिका संपत नसतानाच आता पिंपरी चिंचवड मध्येही अपघातांची संख्या वाढली आहे. अशाच एका अपघातात एका दहा वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. ही घटना पिंपरीमध्ये घडली. एका भरधाव कारने रस्ता क्रॉस करत असलेल्या दहा वर्षीय मुलाला धडक दिली. यात कारचे चाक या मुलाच्या डोक्यावरून गेल्याने तो गंभीर जखमी झाला. मात्र घाबरलेल्या कारचालकाने तिथून धूम ठोकली. आता अखेर या कारचालकाला शोधून त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
हा भीषण अपघात 2 जुलै रोजी पिंपरीतील कुदळवाडी येथील पाटील चौकात झाला. या अपघातात मोहम्मद अफजल खान (वय-10 रा. पाटील चौक, कुदळवाडी, चिखली) याचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी मुलाचे वडील कमाल अहमद मंजूर अल्ली खान (वय-40 रा. पाटील चौक, कुदळवाडी, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मोहम्मद अफजल खान हा रस्ता ओलांडत असताना विक्रम दादाभाऊ कसबे (वय-41 रा. श्रीराम कॉलनी) याने एमएच 14 एचयु 0823 हा नंबर असलेल्या कारने त्याला भरधाव वेगात येत धडक दिली. यात गंभीर जखमी झाल्यामुळे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यातच धडक दिल्यानंतर चालक पळून गेला. त्यामुळे विक्रम कसबे याच्यावर याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 281, 106(1), 125(ब), मोटर वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच पळून गेलेल्या चालकाला शोधून त्याला अटक करण्यात आली आहे.