कुख्यात गुंड गजा मारणे (GAJA MARNE) याच्या चार महाविद्यालयीन चाहत्यांना पुणे पोलिसांनी (PUNE POLICE) बेड्या ठोकल्यात. पुणे शहर पूर्वी शिक्षणाचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध असलेलं विद्यार्थ्यांचं आवडतं शहर होतं. आता मात्र गुन्हेगारीकडे वळणाऱ्या अल्पवयीन मुलांचं शहर बनलं आहे. कारण इथल्या प्रत्येक चौकात, रस्त्यांवर, गल्लीबोळांमध्ये आणि सोशल मीडियावरही गुन्हेगार तयार होत आहेत. अल्पवयीन मुलांकडून दादा, भाऊ, भाई, अण्णा, किंग, बादशहा अशी टोपण नाव ठेवून कुख्यात गुन्हेगारांचे फोटो व्हिडिओ (instagram) पोस्ट केले जात आहेत. आणि सोशल मीडियावर भाई म्हणणाऱ्या अशाच चौघांना पोलिसांनी अटक केली आहे.
नेमकं प्रकरण काय ?
अक्षय निवृत्ती शिंदे, सिद्धार्थ विवेकानंद जाधव, साहिल शाहिल शेख आणि इरफान हसन शेख, अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. या चौघांनी इंस्टाग्राम अकाउंट वर फॉलोवर्स वाढवण्यासाठी आणि प्रत्यक्षात आपली दहशत निर्माण करण्यासाठी पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे याचे व्हिडिओ व्हायरल केले. पुण्याचा किंग, किंग ऑफ महाराष्ट्र, पुण्याचा बादशहा अशा प्रकारचे कॅप्शन लिहले. गजा मारणेचे फोटो, व्हिडिओ, गर्दीचे आणि गाड्यांचे व्हिडिओ पोस्ट केले. अनेकदा या व्हिडिओवर धमक्या देणारे डायलॉग आणि गाणी लावली. त्यामुळेच या चार जणांवर कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच अटकही करण्यात आली आहे. अशा पद्धतींच्या व्हिडिओमुळे गुन्हेगारांना आणि गुन्हेगारीला खतपाणी घातलं जात असल्याचं पोलीस विभागाचं म्हणणं आहे.
पुण्यातील वाढती गुन्हेगारी आणि अल्पवयीन गुन्हेगारांची संख्या पाहून पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी काही महिन्यांपूर्वीच सोशल मीडिया वापरासाठी काही निर्बंध घातले होते. गुन्हेगारीचं आणि गुन्हेगारांचं उदात्तीकरण करणारे प्रकार सोशल मीडियावर आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल. त्या दृष्टिकोनातून पुणे पोलिसांचा सोशल मीडियावर वॉच असणार आहे. अशी माहिती आयुक्तांनी दिली होती. त्याचं अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली आहे. पुण्यातील वाढती गुन्हेगारी आणि गॅंगवॉर कमी करण्यासाठी हा निर्णय योग्य असल्याचं सर्वसामान्यांचं मत आहे. त्यामुळे या कारवाईमुळे ऑनलाईन पद्धतीने दहशत पसरवणाऱ्यांना आळा बसणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.