पालघर : समुद्रकिनार्यावर फिरायला जाणे पिता- पुत्रांच्या जीवावर बेतले (Palghar News) आहे. यामध्ये 14 वर्षांच्या मुलगा सेल्फी काढत असताना त्याचा तोल गेला आणि तो समुद्रात पडला. व त्याला वाचवण्यासाठी गेलेले वडील देखील समुद्रात बुडाले. शैलेंद्र मोरे (वय 42) आणि देवेंद्र मोरे (वय 14)अशी मृत पिता- पुत्रांची नावे आहेत.
काय घडले नेमके?
शैलेंद्र मोरे (वय 42) यांचा दातांचे उपकरणे तयार करण्याचा व्यवसाय असून ते त्यांची आई आणि 14 वर्षाचा मुलगा देवेंद्र यांच्यासोबत वसई पश्चिमेकडील ओमनगर परिसरात राहतात. शैलेंद्र यांनी रविवारी त्यांच्या घरी स्वामी समर्थांचा कार्यक्रम आयोजित केला होता. पूजा संपल्यानंतर पूजेतील निर्माल्य समुद्रात विसर्जित करण्यासाठी त्यांचा 14 वर्षांचा मुलगा देवेंद्रला सोबत घेऊन शैलेंद्र मोरे वसई किल्लानजीक समुद्रकिनारी गेले होते. यावेळी पूजेतील निर्माल्य समुद्रात विसर्जित केल्यानंतर देवेंद्र समुद्रकिनारी असलेल्या जेटीवर मोबाईल घेऊन सेल्फी काढत होता.
यादरम्यान अचानक सेल्फी काढताना तोल गेल्याने देवेंद्र पाण्यात पडला. आपला मुलगा पाण्यात पडल्याचे लक्षात येताच मुलाला वाचवण्यासाठी वडील शैलेंद्र यांनी धावत जात समुद्राच्या पाण्यात उडी मारली. मात्र, पिता व पुत्र दोघेही समुद्राच्या पाण्यात बुडाले. हा सर्व प्रकार तेथे असलेल्या एका इसमाच्या निदर्शनास येताच त्याने तातडीने वसई पोलिसांना या घटनेची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत समुद्रात बुडलेल्या पिता-पुत्राचा शोध सुरू केला. यानंतर शैलेंद्र मोरे यांचा मृतदेह नायगाव खाडीकिनारी सोमवारी रात्रीच्या सुमारास आढळून आला तर मुलगा देवेंद्र याचा मृतदेह अद्याप सापडला नसून त्याचा शोध सुरु आहे.