जळगाव : जळगाव तालुक्यातील खेडी कढोली या भागात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका शेतमजुराने राहत्या घरी विषारी औषध प्राशन करून आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. गुरूवारी सकाळी 7 वाजताच्या सुमारास हि घटना उघडकीस आली. ज्ञानेश्वर रमेश कोळी (वय 35 रा. खेडी कढोली ता.एरंडोल) असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपासाला सुरुवात करण्यात आली आहे. त्यांनी नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
ज्ञानेश्वर कोळी हे जळगाव तालुक्यातील खेडी कढोली या ठिकाणी पत्नी व दोन मुलांसह वास्तव्याला होते. ते शेतमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. ज्ञानेश्वर कोळी यांच्या मेहुण्याच्या मुलीचे लग्न असल्याने ज्ञानेश्वर आपली पत्नी व दोन मुलांसह ते बुधवारी सकाळी 9 वाजता अमळनेर येथे लग्नासाठी गेले होते. यावेळी त्यांची पत्नी आणि मुले हे लग्नघरी थांबले तर ज्ञानेश्वर हे लग्न सोहळा आटोपून दुपारी एकटेच अमळनेर येथून खेडी कढोली येथे घरी परतले.
यानंतर ज्ञानेश्वर कोळी यांनी अचानक मध्यरात्रीच्या सुमारास विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. दुसऱ्या दिवशी सकाळी ज्ञानेश्वर कोळी यांची प्रकृती बिघडल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने ज्ञानेश्वर कोळी यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ज्ञानेश्वर यांना तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.