vinod chavan police

Dharashiv News : पत्नीची हत्या करणाऱ्या ‘या’ सहायक पोलिस निरीक्षकाला जन्मठेप; राज्यभर गाजले होते प्रकरण

1005 0

धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये येरमाळा पोलिस ठाण्याचे तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण यांना जन्मठेप व 50 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. धाराशिव येथील जिल्हा व प्रमुख सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांनी हि शिक्षा सुनावली आहे. यालयाने दिलेल्या या निकालानंतर पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
मोनाली व विनोद चव्हाण यांचा 2014 साली विवाह झाला होता. लग्नाला तीन वर्षे झाले तरी मूल होत नव्हते. त्यामुळे नैराश्येतून मोनाली यांनी पती विनोद चव्हाण यांच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून आत्महत्या केली असे भासवण्यात आले. यानंतर दुसऱ्या दिवशी मोनाली यांचे वडील शेषांक जालिंदर पवार यांनी आपल्या मुलीची हत्या झाली असल्याचा आरोप मोनाली यांच्या सासरच्यांवर केला. यानंतर त्यांनी पती विनोद चव्हाण यांनीच खून केल्याची तक्रार दाखल केली.

सासू-सासऱ्यांची निर्दोष मुक्तता
शेषांक जालिंदर पवार यांच्या तक्रारीवरून पती विनोद चव्हाणसह सासू विमल चव्हाण, सासरा बापू चव्हाण यांच्याविरोधात भादंवि कलम 302, 498 अ व 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते. त्यावर न्यायालयात सुनावणी पार पडली असता विमल चव्हाण व बापूराव चव्हाण यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली तर विनोद चव्हाण यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. हे प्रकरण आरोपी न्यायालयीन कोठडीत (अंडर ट्रायल) ठेवून चालवण्यात आले होते. या प्रकरणाची संपूर्ण राज्यात चर्चा रंगली होती.

Share This News
error: Content is protected !!