प्रेयसीची हत्या करण्याचा प्रयत्न करून प्रियकराने गळफास घेतल्याची खळबळजनक घटना पिंपरी चिंचवड परिसरात घडली होती. मात्र याच प्रकरणातील प्रेयसीचा आता मृत्यू झाला आहे.
नितेश नरेश मिनेकर (वय- 34 रा. येरवडा) असं आत्महत्या केलेल्या तरुणाच नाव असून त्याची 28 वर्षीय प्रेयसी करिष्मा ईश्वर घुमाने हिचा आज रुग्णालयात मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत तरुण आपल्या प्रेयसीला घेऊन दुपारी चारच्या सुमारास राज प्लाझा लॉज येथे आले होते. त्यांनी या लॉजमध्ये रूम बुक केली होती. रूम मध्ये गेल्यानंतर काही वेळातच या दोघांमध्ये जोरदार भांडण सुरू झालं. भांडणाचा आवाज रूमच्या बाहेर पर्यंत येऊ लागला. हे ऐकून हॉटेल मॅनेजरने 112 नंबर वर फोन करून पोलिसांना माहिती दिली. काही वेळात पोलीस हॉटेलमध्ये पोहोचले. त्यांनी रूमचा दरवाजा ठोठावला. त्यावर नितेशने, मी कपडे घालतोय थोड्या वेळात दरवाजा उघडतो, असं उत्तर दिलं. बराच वेळ झाल्यानंतरही दरवाजा उघडला गेला नाही.
पोलिसांना संशय आल्याने त्यांनी थेट दरवाजा तोडला. आत गेल्यानंतर थरकाप उडवणार दृश्य पाहायला मिळालं. नितेशची प्रेयसी ही रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तर नितेशने स्वतः गळफास घेतला होता. या तरुणीला लागलीच यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिची प्रकृती चिंताजनक होती. त्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र या तरुणीचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मात्र लॉजच्या त्या रूममध्ये नेमकं काय घडलं होतं याचा उलगडा अजूनही झालेला नाही.