पुणे जिल्ह्यातील मावळ मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. कॉलेजला दांडी मारून फिरायला गेलेल्या पाच विद्यार्थ्यांबरोबर एक दुर्घटना घडली. ज्यात एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
थेरगाव मधील एम एस कॉलेज मधील पाच विद्यार्थी कॉलेजला दांडी मारून कासारसाई धरणावर फिरायला गेले. त्यावेळी पर्यटनाचा आनंद घेत असताना हे विद्यार्थी पाण्यात उतरले. यावेळी पाहण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने एक विद्यार्थी पाण्यात वाहून गेला. सारंग रामचंद्र डोळसे असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. सारंग काही वेळ पाण्याच्या वर न आल्यामुळे बुडाल्याचे त्याच्या मित्रांच्या लक्षात आले. त्याचवेळी त्यांनी आरडा ओरड सुरू केली. घटनेची माहिती मिळताच काही स्थानिक नागरिक मदतीसाठी घटनास्थळी पोहोचले. या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. परंदवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस, वन्यजीव रक्षक आणि लोणावळ्यातील शिवदुर्ग रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाले. काही वेळाच्या शोधकार्यानंतर रेस्क्यू टीमने सारंग चा मृतदेह बाहेर काढला. या घटनेमुळे संबंधित महाविद्यालय आणि ग्रामस्थांवर शोककळा पसरली आहे. त्याचबरोबर वारंवार प्रशासनाकडून आवाहन करूनही नागरिक आपला जीव धोक्यात घालून पाण्याच्या प्रवाहामध्ये उतरत असल्याने अशा प्रकारच्या दुर्घटना घडत आहेत. त्यामुळेच सर्वांनी अशा ठिकाणी जाणे टाळावे किंवा सर्व खबरदारी घेत पर्यटन करावे, असे आवाहन केले जात आहे.