पुणे : पुण्यातील महसूल विभागाच्या एका अतिउच्चपदस्थ अधिकाऱ्यावर सीबीआयचा (CBI) छापा पडला आहे. सीबीआयचे डीआयजी सुधीर हिरेमठ (CBI DIG Sudhir Hiremath) यांच्या नेतृत्वाखाली ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे. एका IAS अधिकाऱ्यावर अशी कारवाई करण्यात आल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. आता या छाप्यामध्ये कोणत्या गोष्टी उघड होतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
अतिरिक्त महसूल विभागीय आयुक्त अनिल रामोड यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात सीबीआयचे अधिकारी दाखल झाले आहेत. 8 लाख रुपयांची लाच घेताना सीबीआयने अतिरिक्त महसूल विभागीय आयुक्त अनिल रामोड यांना रंगेहाथ पकडले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ज्या प्रकरणी ही लाच घेण्यात आली तो व्यवहार एका जमिनीबाबत होता. सीबीआयच्या अधिकाऱ्यांना याची माहिती मिळताच त्यांनी सापळा रचून ही कारवाई केली आहे. रामोड हे IAS अधिकारी असून महसूल विभागात ते उपायुक्त म्हणून कार्यरत होते.