पुणे : राज्यात सध्या अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. सासवडमध्ये अशीच एक अपघाताची घटना घडली आहे. सासवड रस्त्यावरील वडकी गावाजवळ हा भीषण अपघात घडला आहे.यामध्ये एका खाजगी बसने 4 चाकी कारला धडक दिल्यामुळे हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला आहे तर अन्य 3 जण गंभीर जखमी झाले आहेत.
या भीषण अपघातात विजय गुंडू शिरगुरे यांचा मृत्यू झाला आहे.ते हडपसर येथील रहिवासी होते. तर मयूर विजय शिरगुरे, त्यांचा मुलगा सम्यक आणि त्यांची बहीण ज्योती जितेंद्र गुंडप्पाणकर हे तिघेजण या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत.
या अपघाताप्रकरणी मृत विजय गुंडू शिरगुरे यांची मुलगी अनुषा विजय शिरगुरे हिने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ज्यावेळी हा अपघात झाला तेव्हा शिरगुरे कुटुंब हे आपल्या कारने पुण्याच्या दिशेने जात होते. यादरम्यान वडकी गावाजवळ दिवे घाटाच्या पायथ्याशी भरधाव वेगात असलेल्या एका खासगी बसने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली आणि हा अपघात झाला. लोणी काळभोर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; 5 जण जागीच ठार
काही दिवसांपूर्वी समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला तर 7 जण गंभीर जखमी झाले होते. या अपघातात मृत पावलेल्यांमध्ये तीन महिला आणि 2 लहान मुलांचा समावेश होता. या भीषण अपघात कारचा अक्षरक्षः चुराडा झाला होता. हा अपघात कार चालकाला झोप आल्यामुळे घडला असल्याचे बोलले जात आहे.