Marriage

मधूचंद्राला बायकोने दिला नकार; पतीने खडसावताच समोर आले ‘हे’ धक्कादायक कारण

734 0

नाशिक : आजकाल लग्नाला पोरी मिळत नसल्याने अनेक मुले लग्नाच्या प्रतीक्षेत आहेत. या गोष्टीचा फायदा घेत लग्न लावून फसवणूक करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. नाशिकमध्ये अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात आसलेल्या उत्राणे येथील विवाह झालेल्या तरुणाची बुलढाणा जिल्ह्यातील लग्न जमविणाऱ्या टोळीने सुमारे अडीच लाख रुपयांना फसवणूक केली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील उत्राणे येथील तरुण कामानिमित्त आपल्या नातेवाईकांकडे गेला होता. त्या ठिकाणी विवाहाचा विषय निघाल्यानंतर विजय मुळे नामक लग्न जमवणाऱ्या मध्यस्थी व्यक्तीने मुलीचे आई-वडील गरीब असून 2 लाख 80 हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर त्याने अडीच लाख रुपये देण्याचे मान्य केले. यानंतर त्या तरुणाने दोन लाख रुपये रोख आणि पन्नास हजार रुपये विजय मुळे यांच्या फोन पेवर सेंड केले. पैसे मिळाल्यानंतर २५ मे रोजी बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथे बागलाण तालुक्यातील प्रवीण याचा विवाह अनिता जाधव ऊर्फ पूजा शंकर म्हस्के हिच्याशी लावण्यात आला.

यानंतर काही दिवसांनी नववधूने आपले रंग दाखवण्यास सुरुवात केली. तसेच तिने मधुचंद्रासाठी देखील नकार दिला. यानंतर प्रवीणला याचा संशय आल्याने त्याने नववधूला विश्वासात घेऊन विचारणा केली असता तिने घडलेला सगळा प्रकार सांगितला. तिने यापूर्वी बागलाण तालुक्यातील श्रीपूरवडे येथील हृषीकेश आणि साक्री तालुक्यातील काळगाव येथील चंद्रकांत यांच्याशी आपला विवाह झाल्याचे सांगितले. ही सगळी घटना ऐकून प्रवीणला मोठा धक्का बसला. त्याच्या पायाखालची जमीन सरकली. यानंतर प्रवीणने थेट पोलीस ठाणे गाठून तरुणीला पोलिसांच्या स्वाधीन केले. यानंतर त्याने विजय रामभाऊ मुळे, पूजाचे वडील असल्याची बतावणी करणारा एक अनोळखी इसम, अनिता जाधव ऊर्फ पूजा शंकर म्हस्के यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. या टोळीमध्ये अजून कोणाचा समावेश आहे का याचा तपास पोलीस करत आहेत.

Share This News
error: Content is protected !!