अमरावती : महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त आणि हीन दर्जाचे वक्तव्य करणाऱ्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्यावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गांधींजींबद्दल संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी केलेल्या वक्तव्याचे विधिमंडळामध्ये पडसाद उमटले होते. या वक्तव्याविरोधात राज्यभरातील विविध ठिकाणी आंदोलन करत संभाजी भिडे यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली होती. यानंतर आता अखेर राजापेठ पोलिसांनी कलम 153 अंतर्गत भिडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
संभाजी भिडे हे अनेकदा वादग्रस्त वक्तव्य करत असतात. बडनेरा मार्गावरील जय भारत मंगल कार्यालयात भिडे यांचे गुरुवारी रात्री व्याख्यान होते. यावेळी त्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व करणाऱ्या महात्मा गांधी यांच्याबद्दलच आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. गांधी यांचे वडील मुसलमान होते, असा अजब दावा त्यांनी यावेळी केला. त्यांच्या या वक्तव्यावरून भिडेंवर कठोर कारवाईची मागणी केली जात होती.
भिडे (Sambhaji Bhide) यांच्या कार्यक्रमास वंचित बहुजन आघाडी, भीम आर्मी व भीम ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला होता.कार्यक्रमस्थळी भिडे यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी अनेक जणांना ताब्यात घेतले. आता संभाजी भिडे यांच्याविरोधात अमरावतीतील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे आता संभाजी भिडे यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.