हळदीच्या कार्यक्रमात तलवार, जांबिया घेऊन बेधुंद नाचणाऱ्या नवरदेवाला ठोकल्या बेड्या (व्हिडिओ)

467 0

औरंगाबाद- हळदीच्या कार्यक्रमात मित्राच्या आग्रहास्तव हातात तलवारी, जंबिया घेऊन नाचणे अतिउत्साही नवरदेवाला चांगलेच महागात पडले आहे. औरंगाबाद शहरात घडलेल्या या घटनेनंतर पुंडलिकनगर पोलिसांनी नवरदेवासहित सहा जणांना अटक केली.

शहरातील पुंडलिक नगर परिसरातील रेणुकानगर या ठिकाणी बिभीषण अनिल शिंदे याच्या लग्नाच्या हळदीचा कार्यक्रम होता. यात बिभीषणचा मित्र व आरटीओ एजंट वसीम अय्युब शेख याने तलवार घेऊन डान्स करायला सुरुवात केली. त्यानंतर शुभम सुरेश मोरे याने दोन जांबिये बाहेर काढून बेधुंद नाचायला सुरुवात केली. त्यांच्यासोबत बिभीषण आणि यश पाखरे, शेख बादशहा शेख बाबा, किरण गोरख रोकडे यांनीदेखील तलवार घेऊन मोबाइलमध्ये चित्रण केले. सोशल मिडियावर हा व्हिडीओ अपलोड करताच पोलिसांची त्यावर नजर पडली.

पोलिसांनी त्वरित या अतिउत्साही तरुणांचा शोध घेऊन त्यांच्याकडील हत्यारे जप्त करून त्यांना अटक केली. न्यायालयाने सर्वांची एक दिवसाच्या पोलीस कोठडीत रवानगी केली. सदरची कारवाई सहाय्यक निरीक्षक शेषराव खटाणे, दादाराव राठोड, हवालदार लक्ष्मणराव हिंगे, बाळाराम चौरे, पोलीस नाईक गणेश वैराळकर, जालिंदर मांटे आदींनी केली.

Share This News
error: Content is protected !!