पुणे : पुणे पोलिसांनी (Pune News) आणखी एक मोठी कामगिरी केली आहे. पुण्यात (Pune News) स्फोट करण्याचा कट रचणाऱ्या दहशतवाद्यांना एटीएसच्या पथकाकडून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी दहशतवाद विरोधी पथकाने एका आरोपीला गोंदियातून अटक केली आहे. त्याने पुण्यात याआधी पकडलेल्या दोन दहशतवाद्यांना राहण्यासाठी गोंदियात सोय केली होती. या प्रकरणातील आणखी 6 जणांचा शोध सुरु आहे.
मागच्या आठड्यात पुण्यात दोन दहशतवाद्यांना कोथरूड पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्याकडून तपासात धक्कादायक अशी माहिती समोर आली होती. दोन्ही दहशतवाद्यांनी सातारा आणि कोल्हापूरच्या जंगलात स्फोटकांची चाचणी केल्याची गुप्त माहिती पोलिसांना समजली होती. कोथरूड पोलिसांनी अत्यंत धाडसी कामगिरी करत महम्मद इम्रान महम्मद युसूफ खान ऊर्फ अमीर अब्दुल हमीद खान (वय 23) आणि महम्मद युनूस महम्मद याकूब साकी (वय 24) यांना अटक केली होती.
त्यांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून एक लॅपटॅाप चार फोन एक टॅब्लेट काही पेनड्राईव्ह जप्त करण्यात आले होते. कोथरूड पोलिसांकडून हा तपास एटीएसला वर्ग केल्यानंतर या तपासात अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.