पुणे : पुणे (Pune) पोलिसांच्या गुन्हे शाखेने काही दिवसांपूर्वी दहावी बोर्डाचे तसेच वेगवेगळ्या पदवी अभ्यासक्रमाचे बनावट प्रमाणपत्र (Fake Educational Certificate) तयार करून त्याची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला होता. या प्रकरणी अधिक तपास करत रायगड जिल्ह्यातील रोहा येथून जगदीश रमेश पाठक (वय 33) (Jagdish Ramesh Pathak) या एजंटला अटक करण्यात आली आहे. त्याची अधिक चौकशी केली असता आत्तापर्यंत एकूण 30 जणांकडून पैसे घेऊन त्यांना वेगवेगळ्या अभ्यासक्रमाच्या शाखेची प्रमाणपत्रे वाटप केल्याचे निष्पन्न झाले आहे.
कोण आहे जगदीश रमेश पाठक?
आरोपी जगदीश पाठक हा रोहा रायगड परिसरात एजंट म्हणून काम बघत होता. तो औरंगाबाद येथील मुख्य आरोपी इम्रान सय्यद (Imran Syed) याच्या संपर्कात राहून विविध शाखांचे बनावट प्रमाणपत्र तयार करून त्याची विक्री करत होता. या प्रकरणी आरोपी जगदीश पाठक याच्यावर स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police Station) गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला चार दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर (Assistant Commissioner of Police Narayan Shirgaonkar) हे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.