छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून (Chhatrapati Sambhaji Nagar) एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये बसमधून उतरून रस्ता ओलांडत असताना एका वृद्ध महिलेला रिव्हर्स येणाऱ्या टँकरने चिरडले आहे. ही घटना रविवारी दुपारी केम्ब्रिज चौकामध्ये घडली आहे.
काय घडले नेमके?
अकोला जिल्ह्यातील बार्शि टाकळीमधील पुष्पाबाई वामनराव जगताप (वय 75) यांचा मुलगा योगेश केम्ब्रिज चौकातील इस्कॉन मंदिराजवळील पलर्स हौसिंग सोसायटीत येथे राहतो. योगेश जगताप यांचे ट्रॅक्टर; तसेच पार्ट विक्रीचे शोरुम आहे. नवरात्र असल्याने पुष्पाबाई मुलाकडे आल्या होत्या. दुपारी अडीचच्या सुमारास त्या बसने हॉटेल कलशसमोर उतरल्या. त्या वेळी योगेश आईला घेण्यासाठी कारने पोहोचला होता. यावेळी बसमधून उतरून त्या रस्ता ओलांडत असताना वेगाने मागे येत असलेल्या सिमेंट कॉक्रीट टँकरने पुष्पा यांना चिरडले. त्यांना 50 फुटांपर्यंत फरफटत नेले.
या अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक आत्माराम घुगे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. यानंतर नागरिकांच्या मदतीने पुष्पा यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात नेण्यात आला. या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात योगेश जगताप यांच्या तक्रारीवरून टँकरचालक निंगराज मलप्पा बिस्गोंडविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. आपल्या डोळ्यादेखत आईचा मृत्यू झाल्याने योगेशने एकच हंबरडा फोडला. आपल्या एकुलत्या एक मुलाला भेटण्यासाठी आलेल्या आईचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.