संजय बियाणी यांच्या कुटुंबाला निनावी पत्र पाठवणाऱ्याला अटक
नांदेड- नांदेड शहरातील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येनंतर त्यांच्या घरी निनावी पत्र पाठवणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. वैयक्तिक भांडणाचा वचपा काढण्यासाठी त्याने दुसऱ्याच व्यक्तीच्या नावाचा उल्लेख केल्याचे निष्पन्न झाले आहे.
विठ्ठल सूर्यवंशी (वय ७४, रा. आटाळा ) असे या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. हे निनावी पत्र स्पीड पोस्टने आले होते, तर पत्रात लिहिलेला मजकूर हिंदी भाषेत होता. सूर्यवंशी याचा गावातील पांडुरंग येवले नामक व्यक्तीशी शेतीच्या कारणावरुन वाद होता. त्यामुळे येवले यांना या गुन्ह्यात अडकविण्यासाठी सूर्यवंशी याने त्यांच्या नावाचा उल्लेख करुन पत्र पाठवले. खोडसाळपणाने पत्र पाठवल्याची कबुली सूर्यवंशीने दिल्याचं पोलिसांनी सांगितले. या पत्रामुळे आधीच घाबरलेले बियाणी कुटुंबिय आणखीन भयभीत झाले. ५ एप्रिल २०२२ रोजी संजय बियाणी यांची राहत्या घराबाहेरच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. गाडीतून बाहेर पडलेल्या बियाणी यांच्यावर दोघाजणांनी गोळीबार केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत आहे.
काय लिहिलंय त्या पत्रात ?
बियाणी साब को ठोकनेका मनसुबा परभणी में हुवा , जिसमे आनंद नगर से बहुत बड़ा दादा पांडुरंग येवले परभणी आया था …. जिसेने पहले गोरठेकर के बच्चे को मारा था, जो आताळा का रेती माफिया है, अभी भी डरसे कोई ऊसे बात नहीं करते …
