सांगली : विटा नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यास लाच घेताना अॅन्टी करप्शनच्या (Anti-corruption) अधिकाऱ्यांनी रंगेहाथ (Raid Hand) पकडले आहे. विनायक औंधकर (Vinayak Aundhkar) असे लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे. नगरपालिकेच्या कार्यालयातच लाच (Bribe) घेत असताना त्यांना ही अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
विटा नगरपालिकेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन लाखांची लाच घेताना रंगेहात पकडले. विनायक औंधकर यांनी विटा शहरातल्या एका ठेकेदाराकडे बांधकामाच्या इमारतीसाठी परवानगी देण्याकरिता अडीच लाख रुपयांची मागणी केली. यानंतर हा व्यवहार तडजोड करून दोन लाखांवर ठरला.
यानंतर संबंधित ठेकेदाराने सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबतची तक्रार दाखल केली. तक्रार दाखल केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याची पडताळणी करून प्रतिबंधक विभागाकडून विटा नगरपालिका कार्यालयामध्ये सापळा रचून तक्रारदाराकडून दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना औंधकर यांना रंगेहात पकडले. यानंतर त्यांच्यावर गुन्हा (Crime) दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.
कोण आहेत विनायक औंधकर ?
विनायक औंधकर यांची तीन महिन्यांपूर्वी विटानगर पालिकेच्या मुख्याधिकारीपदी नियुक्ती झाली होती. या आधी ते सातारा जिल्ह्यातल्या कराड नगरपालिकेमध्ये मुख्याधिकारी म्हणून कार्यरत होते. विटा नगरपालिकेमध्ये नियुक्ती झाल्यानंतर त्यांची कारकीर्द सुरू होण्यापूर्वी वादग्रस्त ठरली आहे. या घटनेमुळे विटा नगरपालिकेसह जिल्हा प्रशासनामध्ये मोठी खळबळ उडाली आहे.