पुणे-पिंपरी चिंचवड साठी कालचा रविवार हा अपघात वार ठरला आहे. कारण काल तीन अपघाताच्या घटना घडल्या. आणि यात दुर्दैवाने तीन जणांचा मृत्यू झाला आहे. यातीलच एक घटना पिंपरी चिंचवड मध्ये घडली. पिंपरी चिंचवड शहरातील पुणे-बेंगलोर महामार्गावर एका भरधाव ट्रकने रस्ता ओलांडणाऱ्या पती-पत्नीला जोरदार धडक दिली. ज्यात 42 वर्ष व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर महिला ही गंभीर जखमी आहे.
नेमकं काय घडलं ?
प्राथमिक माहितीनुसार, शरद वसंत गायकवाड(रा. पिंपरी चिंचवड) हे रविवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास आपल्या पत्नीसोबत शहरातील पुणे बेंगलोर महामार्ग नजीक असलेल्या शनि मंदिराकडून डिकेथलॉन मॉलकडे जात होते. यावेळी ते दोघे रस्ता ओलांडत असताना समोरून भरधाव ट्रक आला आणि जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की हे दोघेही पती-पत्नी १० ते १२ फूट हवेत उडाले व तितक्याच जोरात खाली पडले. ज्यामुळे शरद गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्या पत्नी या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या अपघाताची माहिती मिळताच तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी महिलेला रुग्णालयात दाखल केले. तसेच शरद गायकवाड यांचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. अपघात झाल्यानंतर वाकड पोलिसांनी ट्रक ड्रायव्हरला ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.