शहाजीबापूंचा पराभव करणारे डॉ. बाबासाहेब देशमुख कोण आहेत ?

Dr. babasaheb Deshmukh Sangola: “काय झाडी, काय डोंगर..” डायलॉगने प्रसिद्ध झालेल्या शहाजीबापूंचा पराभव करणारे डॉ. बाबासाहेब देशमुख कोण आहेत ?

276 0

यंदाच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीच्या अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला. त्याचबरोबर अल्पावधीतच प्रसिद्ध झालेल्या महायुतीच्या एका नेत्यालाही हार पत्करावी लागली. “काय झाडी, काय डोंगर, काय हाटील” या डायलॉगने प्रसिद्धी झोतात आलेले शहाजी बापू पाटील (Shahaji bapu patil, Sangola) यांचा डॉ. बाबासाहेब देशमुख (Dr. babasaheb Deshmukh) या तरुण नेत्याने पराभव केला.

बाबासाहेब देशमुख नेमके कोण आहेत ? 

डॉ. बाबासाहेब देशमुख हे शेकापचे मातब्बर नेते गणपतराव देशमुख यांचे नातू असून त्यांनी एमबीबीएस आणि एमडी पर्यंतचं शिक्षण घेतलं आहे. पेशाने डॉक्टर असूनही आजोबांकडून आलेला राजकारणाचा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी ते राजकारणात आले. आणि यंदाच्या विधानसभेत निवडून आलेले शेकापचे ते एकमेव आमदार ठरले. खरं तर सांगोला हा शेकापचा बालेकिल्ला… शेकापचे नेते स्वर्गीय गणपराव देशमुख हे तब्बल 10 वेळा या मतदारसंघातून विजयी झाले. मात्र 2019 च्या विधानसभेत शेकापचा बुरुज ढासळला आणि 1995 ला काँग्रेसकडून निवडून आलेल्या आणि 2019 ला शिवसेनेकडून निवडणूक लढवलेल्या शहाजी बापूंनी आपला झेंडा फडकवला. त्यावेळी बाबासाहेब देशमुख यांचे बंधू अनिकेत देशमुख यांचं आव्हान शहाजी बापूंसमोर होतं. त्यावेळी अवघ्या 768 मतांनी ते निवडून आले. पुढे याच शहाजी बापूंनी शिवसेना फुटल्यानंतर एकनाथ शिंदे यांची साथ दिली. पहिल्यांदाच गुवाहाटीला गेलेले शहाजी बापू तिथली झाडी, डोंगर, हॉटेल बघून एकदम ओके झाले आणि प्रसिद्धी झोतात आले. त्यामुळे सांगोल्यात पुन्हा शिवसेनेचा डंका वाजणार या कॉन्फिडन्स मध्ये आपण हरलो तर फाशी घेऊ इतकं टोकाचं वक्तव्य त्यांनी केलं होतं. आणि शेकापच्या युवा नेत्यांनं शहाजी बापूंना पराभूत केलं.

…आणि शहाजी बापू हरले

सांगोल्यात पुन्हा शेकापचा झेंडा फडकवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या देशमुख बंधूंना महाविकास आघाडीकडून ही जागा शेकापला मिळावी अशी अपेक्षा होती. मात्र मविआने ठाकरे गटाला ही जागा दिल्याने स्वतंत्र लढण्याचा निर्णय बाबासाहेब देशमुख यांनी घेतला. बंधू अनिकेत देशमुख यांच्या पराभवाचा वाचपा काढण्यासाठी बाबासाहेब देशमुख निवडणुकीत उतरले. देशमुख बंधूंनी सर्वतोपरी प्रचार केला. तिरंगी लढतीचा फायदा शहाजी बापूंना होईल असं वाटत असतानाच खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे स्वतः देशमुख यांच्या प्रचारासाठी गेले. व आपल्याला शरद पवार साहेबांनी पाठवल्याचं उघडपणे सांगितलं. याचाच अर्थ शरद पवारांनी देशमुख यांच्यासाठी फिल्डिंग लावली होती. या सगळ्याचा फायदा झाल्यानं बाबासाहेब देशमुख यांना 1 लाख 16 हजार 256 मतं मिळाली. त्यांनी जवळपास 25000 च्या फरकाने शहाजी बापूंचा पराभव केला.

स्तुत्य उपक्रमाची घोषणा

डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या रूपाने शेतकरी कामगार पक्ष अजूनही राज्याच्या राजकारणात जिवंत आहे. त्यातच देशमुख यांनी ज्या गावात जेवढ्या मतांचं लीड मिळालंय, त्या गावात तेवढी झाडं लावण्याच्या उपक्रमाची घोषणा केली. ज्याची सध्या राज्यभर चर्चा होत आहे. तर दुसरीकडे पराभूत झालेल्या शहाजी बापूंचं पुनर्वसन शिवसेना कसं करणार याकडे जनतेचं लक्ष लागलंय.

Share This News
error: Content is protected !!