मार्च महिन्यात कोणकोणते सण आणि आंतरराष्ट्रीय महत्वाचे दिवस साजरे केले जातात ? जाणून घेऊयात.
१ मार्च – जागतिक नागरी संरक्षण दिन
जागतिक नागरी संरक्षण दिन दरवर्षी 1 मार्च रोजी जागतिक नागरिकांचे नागरी संरक्षणाचे महत्त्व लक्षात आणून देण्यासाठी साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय नागरी संरक्षण संघटनेने (ICDO) 1990 मध्ये हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. देशातील नागरिकांचे जीवित, मालमत्ता तसेच नागरी संस्था, उद्योगधंदे, वसाहती इत्यादींचे संरक्षण करण्यासाठी नागरिकांच्या स्वयंस्फूर्त सहभागाने आणि शासकीय साहाय्याने उभारलेली व्यवस्था म्हणजे नागरी संरक्षणव्यवस्था.
१ मार्च – शून्य भेदभाव दिन
शून्य भेदभाव दिन (Zero Discrimination Day) दरवर्षी 1 मार्च रोजी जागतिक स्तरावर हा दिन साजरा केला जातो. प्रत्येकाने वय, लिंग, वंश, त्वचेचा रंग, उंची, वजन इत्यादींचा विचार न करता सन्मानाने जीवन जगावे यासाठी हा दिन साजरा केला जातो. सर्वप्रथम, 1 मार्च 2014 रोजी UN ने हा दिवस साजरा केला होता.
१ मार्च – महाशिवरात्री
माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशी तिथीला हिंदू समाजात महाशिवरात्र म्हणतात. प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीयुक्त चतुर्दशीला शिवरात्री असते. मात्र माघ महिन्यातील शिवरात्रीचा महिमा मोठा आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व हिंदू बांधव उपवास करतात. भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी उपवास संपवतात. उत्तर भारतात हाच दिवस फाल्गुन महिन्यात गणला जातो, तर इंग्रजी महिन्याप्रमाणे हा दिवस फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात येतो .
१ मार्च – वसंतराव दादा पाटील पुण्यतिथी
सांगली जिल्ह्यातील, मिरज तालुक्यातील पद्माळे या छोट्या गावी जन्मलेले वसंतदादा 1977 ते 1985 या काळात चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. एकूण सुमारे चार वर्ष त्यांनी राज्याचे मुख्यमंत्रिपद सांभाळले. ते काही काळ राजस्थानचे राज्यपालही होते. 1972 मध्ये ते प्रथम मंत्री झाले होते.
*२ मार्च – डॉ. काशिनाथ घाणेकर पुण्यतिथी*
डॉ. काशिनाथ घाणेकर – (14 सप्टेंबर 1930 – 2 मार्च 1986) डॉ. काशीनाथ घाणेकर यांचे मराठी रंगभूमी आणि मराठी चित्रपट सृष्टीत अतुलनीय योगदान होते. मराठीशिवाय त्यांनी ‘अभिलाशा’सारख्या हिंदी चित्रपटांत देखील उत्तम अभिनय केला. डॉ. काशीनाथ घाणेकर हे व्यवसायाने दंत शल्यचिकित्सक होते. नाटककार वसंत कानेटकर यांनी लिहिलेल्या ‘रायगडला जेव्हा जाग येते’ या नाटकातील संभाजी महाराजाच्या भूमिकेने ते एक लोकप्रिय अभिनेते झाले.
३ मार्च – जागतिक वाईल्डलाईफ दिवस
जागतिक वाईल्डलाईफ दिवस हा दरवर्षी तीन मार्च रोजी साजरा केला जातो. वनस्पती आणि प्राण्यांच्या संवर्धनासाठी जागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. आजच्या वातावरण बदलाच्या संकटाचा पृथ्वीवरील सजीवांना मोठा सामना करावा लागतोय. प्राणी आणि वन्य जीवनावर असलेला धोका लक्षात घेता 2013 साली संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने दरवर्षी 3 मार्च हा जागतिक वर्ल्डलाईफ दिवस साजरा करण्याचं ठरवलं. त्या माध्यमातून पृथ्वीवरच्या प्राणी आणि वनस्पती जीवनाविषयी जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो.
३ मार्च – जागतिक श्रवण दिन
जागतिक श्रवण दिन दरवर्षी 3 मार्च रोजी बहिरेपणा कसा टाळता येईल याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि जगभरात श्रवणशक्तीला प्रोत्साहन देण्यासाठी साजरा केला जातो.
४ मार्च – राष्ट्रीय सुरक्षा दिन
भारतामध्ये 4 मार्च रोजी नॅशनल सेफ्टी कौन्सिल ऑफ इंडिया द्वारे राष्ट्रीय सुरक्षा दिन साजरा केला जातो. हा दिवस लोकांना आर्थिक नुकसान, आरोग्य समस्या आणि लोक त्यांच्या जीवनात भेडसावत असलेल्या इतर समस्यांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी साजरा केला जातो.
४ मार्च – कर्मचारी प्रशंसा दिवस
4 मार्च रोजी कर्मचारी प्रशंसा दिवस साजरा केला जातो. कोणत्याही यशस्वी व्यवसायासाठी कर्मचाऱ्यांशी असलेला संबंध मजबूत असणे महत्त्वाचे आहे. याचं महत्व पटवून देणारा हा दिवस.
४ मार्च – रामकृष्ण जयंती
हिंदू चंद्र दिनदर्शिकेनुसार, रामकृष्णाचा जन्म शुक्ल पक्षाच्या फाल्गुन महिन्यात द्वितीयेला झाला होता. दरवर्षी त्यांची जयंती सर्व रामकृष्ण मठांमध्ये साजरी केली जाते. यंदा तो 4 मार्च रोजी साजरा होणार आहे.
८ मार्च – जागतिक महिला दिन
हा दिवस जागतिक स्तरावर दरवर्षी 8 मार्च रोजी महिलांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय कामगिरीचा उत्सव साजरा करण्यासाठी साजरा केला जातो. तसेच, लिंग समानतेचे महत्व पटवून देण्यासाठीदेखील हा दिवस साजरा केला जातो.
९ मार्च – धूम्रपान निषेध दिवस
धूम्रपानाद्वारे तंबाखूच्या हानिकारक आरोग्यावरील परिणामांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि जगभरातील लोकांना धूम्रपान सोडण्यास प्रोत्साहित करण्यासाठी दरवर्षी मार्चच्या दुसऱ्या बुधवारी धूम्रपान निषेध दिवस पाळला जातो.
१० मार्च – सीआईएसएफ स्थापना दिवस
सीआईएसएफ स्थापना दिवस दरवर्षी 10 मार्च दिवशी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. 1969 साली या दलाची स्थापना झाली आहे. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर दिल्लीतील त्यांच्या मुख्यालयामध्ये 10 मार्च दिवशी जोषपूर्ण वातावरणामध्ये सीआईएसएफ दिवस साजरा केला जातो.
१० मार्च – सावित्रीबाई फुले पुण्यतिथी
सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांचे पती ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांना भारतीय स्त्रीवादाची जननी मानले जाते. सावित्रीबाई आणि त्यांचे पती यांनी 1848 मध्ये भिडेवाड्यात पुण्यात मुलींच्या शाळेची स्थापना केली.
१४ मार्च – पाय डे
14 मार्च रोजी जगभरात पाय डे साजरा केला जातो. पाय हे गणितामध्ये स्थिरांक दर्शवण्यासाठी वापरलेले प्रतीक आहे. हे वर्तुळाच्या परिघाचे त्याच्या व्यासाचे गुणोत्तर आहे जे अंदाजे आहे. 3.14 इतके आहे.
१४ मार्च – अल्बर्ट आइन्स्टाईन जन्मदिन
अल्बर्ट आइन्स्टाईन – (14 मार्च 1879- 18 एप्रिल 1955) हे एक सैद्धान्तिक भौतिकशास्त्रज्ञ होते आणि सार्वकालिक सर्वश्रेष्ठ वैज्ञानिकांपैकी एक म्हणून ते गणले जातात. सापेक्षतावादाचा सिद्धांन्त, प्रकाशीय विद्युत परिणाम, पुंजभौतिकी, विश्वशास्त्र, विश्वरचनाशास्त्र वगैरे क्षेत्रांमध्ये त्यांचे विशेष योगदान आहे. त्यापैकी प्रकाशीय विद्युत परिणाम या सिद्धान्तासाठी आणि “त्यांच्या सैद्धान्तिक भौतिकशास्त्राच्या सेवेसाठी” इ.स. 1921साली त्यांना नोबेल पुरस्कार देऊन सन्मानित केले गेले.
१५ मार्च – आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन
दरवर्षी 15 मार्च रोजी ग्राहक हक्क आणि गरजांबद्दल जागतिक जागरूकता वाढवण्यासाठी पाळला जातो. हा दिवस सर्व ग्राहकांच्या हक्कांचा आदर करण्यासाठी साजरा केला जातो.
१६ मार्च – राष्ट्रीय लसीकरण दिवस
दरवर्षी 16 मार्च रोजी भारतात राष्ट्रीय लसीकरण दिवस साजरा केला जातो. जो राष्ट्रीय लसीकरण दिवस (IMD) म्हणूनही ओळखला जातो. 16 मार्च 1995 रोजी तोंडावाटे पोलिओ लसीचा पहिला डोस देण्यात आला तेव्हा हे पहिल्यांदा दिसून आले. पोलिओच्या लसीकरणाबाबत जनजागृती करण्याचा हा प्रयत्न आहे.
१७ मार्च – होळी
होळी हा एक प्राचीन हिंदू सण आहे आणि या उत्सवाला रंगांचा उत्सव, प्रेमाचा उत्सव आणि वसंत उत्सव म्हणून देखील ओळखले जाते. भगवान विष्णूंचा नरसिंह नारायण म्हणून हिरण्यकश्यपू या दृष्ट राजावर विजय मिळवला होता आणि त्यावेळीपासून हा सण साजरा केला जातो. होळी हा सण हिवाळा संपल्यानंतर आणि वसंत ऋतूच्या सुरुवातीस साजरा केला जातो.
१८ मार्च – धूलिवंदन दिन
धूलिवंदन हा सण होळीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो. यास धुळवड असेही म्हटले जाते. या दिवशी महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी असते. हा सण फाल्गुन कृष्ण प्रतिपदेला साजरा करतात. परंपरेप्रमाणे या दिवशी होलीका दहनाची राख एकमेकांना लावतात.
१९ मार्च – जागतिक निद्रा दिन
‘वर्ल्ड स्लीप डे’ हा दरवर्षी मार्च महिन्यातील तिसर्या शुक्रवारी साजरा केला जातो. यावर्षी 19 मार्च म्हणजेच ‘जागतिक निद्रा दिन’ साजरा केला जात आहे. पहिल्यांदा निद्रा दिन 2008 मध्ये साजरा करण्यात आला. झोप आणि आरोग्य यांच्यातील संबंधाबद्दल लोकांना जागरूक करणे हे या दिवसाचं मुख्य उद्दिष्ट आहे.
२० मार्च – आंतरराष्ट्रीय आनंद दिन
आंतरराष्ट्रीय आनंद दिन दरवर्षी 20 मार्च रोजी साजरा केला जातो. 2013 पासून, संयुक्त राष्ट्रांनी जगभरातील लोकांच्या जीवनातील आनंदाचे महत्त्व ओळखण्यासाठी हा दिवस साजरा केला आहे.
२० मार्च – जागतिक चिमणी दिन
चिमण्यांच्या संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी 20 मार्च रोजी जगभरात जागतिक चिमणी दिन साजरा केला जातो. हा दिवस लोक आणि चिमण्या यांच्यातील नातेसंबंध देखील साजरा करतो. चिमण्यांबद्दल प्रेम पसरवणे, त्यांच्या जीवनातील महत्त्वाबद्दल जागरूकता इ.या दिनाचे उद्दिष्ट आहे.
२१ मार्च – छत्रपती शिवाजी महाराज जयंती (तिथीनुसार)
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला. परंतु, तिथीनुसार, या वर्षी फाल्गुन चतुर्थी 21 मार्च 2022 रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी केली जाणार आहे.
२१ मार्च – आंतरराष्ट्रीय वन दिवस
21 मार्च रोजी, पृथ्वीवरील जीवन चक्र संतुलित करण्यासाठी जंगलांची मूल्ये, महत्त्व आणि योगदान याबद्दल जनजागृती करण्यासाठी दरवर्षी जागतिक वनीकरण दिन किंवा आंतरराष्ट्रीय वन दिवस साजरा केला जातो. 1971 मध्ये, युरोपियन कन्फेडरेशन ऑफ अॅग्रिकल्चरच्या 23 व्या आमसभेत जागतिक वनीकरण दिनाची स्थापना करण्यात आली होती.
२१ मार्च – जागतिक कविता दिन
21 मार्च रोजी, मानवी मनातील सर्जनशील भावना व्यक्त करण्यासाठी दरवर्षी जागतिक कविता दिन साजरा केला जातो. 1999 मध्ये पॅरिसमध्ये झालेल्या युनेस्कोच्या 30 व्या अधिवेशनात 21 मार्च हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
२१ मार्च – जागतिक हवामान दिवस
जागतिक हवामान दिन दरवर्षी 23 मार्च रोजी साजरा केला जातो. सन 1950 मध्ये आजच्या दिवशी जागतिक हवामान संस्था स्थापन झाली. म्हणून 23 मार्च या दिवसाची जागतिक हवामान दिवस म्हणून निवड करण्यात आली.
२४ मार्च – जागतिक क्षयरोग दिन
डॉ. रॉबर्ट कॉच यांनी 1882 मध्ये मायकोबॅक्टेरियम क्षयरोगाचा शोध लावला. त्या तारखेच्या स्मरणार्थ दरवर्षी 24 मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिन साजरा केला जातो.
२७ मार्च – जागतिक रंगभूमी दिन
27 मार्च हा दिवस दरवर्षी ‘जागतिक रंगभूमी दिन’ म्हणून साजरा केला जातो. 1961 मध्ये ‘युनेस्को’च्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिटय़ूटने या दिवसाची सुरुवात केली होती. पहिला जागतिक रंगभूमी दिन 1962 मध्ये साजरा झाला. त्यानंतर दरवर्षी या दिवशी विविध कार्यक्रम व उपक्रमांद्वारे जागतिक रंगभूमी दिन उत्साहाने साजरा होतो.