खासगी गाडीवर लाल दिवा लावणाऱ्या आणि वरिष्ठांच्या अँटी चेंबरवर डल्ला मारणाऱ्या प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची वाशिम जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी अप्पर मुख्य सचिवांना लिहिलेल्या 25 पानी पत्रानंतर खेडकर यांची बदली करण्यात आली आहे..
पुजा खेडकर या पुणे जिल्ह्यात परिविक्षाधिन सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून रूजू झाल्या होत्या. पण आता त्यांची उचलबांगडी करण्यात आल्याने त्या राज्यभरात चर्चेत आल्या आहेत. यापुढे वाशिम जिल्ह्यामध्ये त्यांना सेवा करावी लागणार आहे. नियमानुसार कोणत्याही आयएएस, आयपीएस अधिकाऱ्याला 2 वर्षांचा प्रोबेशनचा कार्यकाळ पूर्ण करावा लागतो. या काळात संबंधित अधिकाऱ्यांना विविध विभागांमध्ये काम करावे लागते. त्यानंतर कामाचा अनुभव आल्यानंतर प्रत्यक्ष नियुक्ती केली जाते.
खेडकर यांच्याविरोधात पुण्याचे जिल्हाधिकारी असलेल्या दिवसे यांनी मुख्य अप्पर सचिवांकडे पत्र लिहित अहवाल सादर केला होता. या अहवालात त्यांनी वरिष्ठ अधिका-याचे अॅंटी चेंबर बळकावल्यापासून ते खासगी गाडीवर अंबर दिवा आणि महाराष्ट्र शासन लिहिले असल्याचा उल्लेख करत खेडकर यांची प्रशिक्षणासाठी दुस-या जिल्ह्यात नियुक्ती करावी, तसेच त्यांच्या वडिलांची वर्तवणूक चुकीची असल्याचे देखील त्यांनी म्हटले असून या अहवालात व्हॉट्सअप चॅटचे फोटोदेखील जोडले आहेत. त्यानुसार ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडेकर यांची वाशिममध्ये बदली करण्यात आली आहे.