मुंबई: शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले. मेटे यांच्या गाडीला रविवारी पहाटे भीषण अपघात झाला. त्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.
मेटे यांचा अपघात नसून घातपात आहे असा संशय त्यांच्या कुटुंबीयांकडून व्यक्त करण्यात येत असतानाच मेटे यांच्या दुसऱ्या चालकाने मेटे यांच्या मृत्यूपूर्वी 3 ऑगस्टच्या रात्री विनायक मेटे यांच्या कारचा पाठलाग झाल्याचा दावा केला होता. यामुळे विनायक मेटे यांच्या मृत्यूचे गूढ वाढत असल्याचे पहायला मिळत आहे.
विनायक मेटे यांच्या कारचा शिक्रापूरदरम्यान पाठलाग करणारी कार रांजणगाव पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या कारमध्ये चालकासह 6 जण असल्याची माहिती समोर आली आहे. 3 ऑगस्टला विनायक मेटे यांच्या एका कार्यकर्त्यासह पुण्याच्या दिशेने येत असताना त्यांच्या कारचा पाठलाग केल्याचा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले होते.
शिवसंग्रामचे कार्यकर्ते यांनी विनायक मेटेंच्या गाडीचा दोन किलोमीटरपर्यंत पाठलाग झाल्याचा दावा केला होता. 3 ऑगस्ट रोजी विनायक मेटे त्यांच्या एका कार्यकर्त्यासमवेत पुण्याच्या दिशेने येत असताना हा प्रकार घडल्याचं त्यांनी सांगितलं होतं.
यासंदर्भात पोलिसांनी अशी माहिती दिली की , गाडीचा मालक आणि चालक संदीप वीर याला ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे कसून चौकशी सुरु आहे. कारमधील सहापैकी एकाचा वाढदिवस असल्याने ते शिरुरला गेले होते. त्यांचे नातेवाईकदेखील शिरुरमध्ये आले होते, अशी माहिती चौकशीमधून समोर आली आहे.