मुंबई : भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेचा जाहीर पाठिंबा असल्याचे आज शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घोषित केले. सोमवारी मातोश्रीवर पार पडलेल्या खासदारांच्या बैठकीनंतर चर्चेला उधाण आले असताना, या विषयावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “काही बातम्या या विचित्र पद्धतीने पसरल्या आहेत. काल खासदारांची बैठक झाली. या बैठकीमध्ये कोणीही माझ्यावर दबाव आणलेला नाही. राष्ट्रपतीपदी कोणाला पाठिंबा द्यायचा हे तुम्ही ठरवा. कुणाला पाठिंबा द्यायचा कुणाला नाही हे तुम्ही सांगाल तसं करू.” असं खासदारांनी सांगितल्याचं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
https://youtu.be/-rgC_dFjxvE
याविषयी आज मी माझी वैयक्तिक भूमिका स्पष्ट करत आहे. शिवसेनेतील आदिवासी समाजात काम करणाऱ्यांनी विनंती केली. एकलव्य संघटनेचे ढवळे यांनी देखील मला विनंती केली आहे. निर्मला गावित आणि आमच्या पाडवी यांच्या देखील विनंतीचा मी विचार केला आहे.
आदिवासी समाजातील महिलेला राष्ट्रपती होण्याची संधी मिळत आहे, यातून आम्हाला देखील ओळख मिळेल. असे देखील उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू यांना शिवसेनेचा जाहीर पाठिंबा घोषित केला आहे.