2025 च्या जानेवारी महिन्यामध्ये कुंभमेळा होणार आहे. त्यासाठी जगभरातून भाविक, संत महंत, यात्रेकरू प्रयागराज मध्ये येणार आहेत. त्यासाठी आत्तापासूनच प्रशासकीय यंत्रणा कामाला लागल्या असून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तयारी केली जात आहे. यावेळी तैनात करण्यात येणाऱ्या पोलिसांसाठीही विशेष अटी आणि नियम घालून देण्यात आले आहेत.
डीजीपी मुख्यालयातून प्रयागराजला पाठवल्या जाणाऱ्या पोलीस तुकड्यांसंदर्भात विषेश काळजी घेतली जाण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या महाकुंभ मेळ्यात मद्यपान आणि मांसाहार सेवन करणाऱ्या पोलिसांना तैनात केलं जाणार नाही. या व्यतिरिक्त पोलीस कर्मचाऱ्यांची प्रतिमा, त्यांचा स्वभाव, दैनंदिन जीवनातील वर्तणूक आणि सत्यनिष्ठा असावी अशा अटी घालण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर वयोमर्यादा आखून देण्यात आली आहे. याशिवाय शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सुदृढ असणाऱ्या पोलिसांनाच तैनात करण्यात येणार आहे. याशिवाय मूळचे प्रयागराजचे असलेले पोलीस कर्मचारी हे या पोलीस बंदोबस्तामध्ये समाविष्ट नसतील, असे निर्देश देण्यात आले आहेत.
पोलीस बंदोबस्ताबरोबरच येणाऱ्या भाविकांच्या राहण्याची योग्य सोय व्हावी यासाठी देखील प्रशासनातर्फे प्रयत्न केले जात आहेत. ज्या घरांमध्ये रिकाम्या खोल्या आहेत त्या ठिकाणी भाडेतत्त्वावर भाविकांना राहण्याची सोय केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.