पुणे : 1 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi ) पुणे दौऱ्यावर आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi ) यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बंदोबस्ताची कडेकोट आखणी केली असून, त्यांच्या सुरक्षेसाठी 5 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन देखील होणार आहे.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शन घेणार आहेत.1 ऑगस्टला पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी प्रशासकीय सुरक्षा यंत्रणा सज्ज झाल्या असून, कार्यक्रम सुरळीत पार पडावा, यासाठी संबंधित यंत्रणा बैठका घेत आहेत. विविध अधिकाऱ्यांना जबाबदारीचे वाटपही करण्यात आले आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेले एसपीजी (स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप), एसआरपीएफ, फॉर्सवन चे जवान तैनात असणार आहेत. कार्यक्रम स्थळाची बॉम्बशोधक आणि नाशक पथकाने पाहणी केली असून 28 जुलै पासून कार्यक्रम होईपर्यंत दौऱ्याचा परिसर ‘नो फ्लाइंग झोन’ करण्यात आला आहे.
कसा असेल नरेंद्र मोदींचा दौरा
सर्वप्रथम ते विमानाने लोहगाव येथील हवाई दलाच्या टेक्निकल एअरपोर्ट येथे येतील. त्यानंतर ते हेलिकॉप्टरने शिवाजीनगर येथील ॲग्रिक्लचर कॉलेजच्या मैदानावर पोहोचतील.पुढे ते वाहनाने रस्तामार्गे सर्व नियोजित कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. एसपीजीच्या पथकाने पंतप्रधान उतरणार असलेले हेलिपॅड, त्यांचे कार्यक्रम होणारी ठिकाणे, त्याचबरोबर त्यांचा ताफा जाणारे रस्ते याची पाहणी केली आहे.
नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरात हॉटेल, लॉजची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर सराईत गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात येत आहे. त्यासाठी कॉम्बिग ऑपरेशनची मोहीम राबवली जात आहे.