शिक्षणाच्या माहेरघरात अनधिकृत शाळांचे पेव फुटले आहे. कारण पुण्यातील तब्बल 50 शाळा अनधिकृत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता या शाळांमध्ये नेमके किती विद्यार्थी आहेत ? शाळांवर कारवाई झाल्यास या विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाचं काय हे सगळे प्रश्न उभे राहिलेत. त्याचबरोबर आपली ही मुले अनधिकृत शाळांमध्ये नाहीत ना हे पुणेकरांनी तपासून घेणे गरजेचे झाले आहे.
नेमकं प्रकरण काय ?
पुण्यातील 50 शाळा अनधिकृत असल्याची माहिती उघड झाली आहे. यामध्ये पुणे शहरातील 14, जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 25 आणि पिंपरी चिंचवडमधील 11 शाळांचा यामध्ये समावेश आहे. विशेष म्हणजे या 50 अनधिकृत शाळांपैकी 49 शाळा या इंग्रजी माध्यमांच्या आहेत.
या सर्व अनधिकृत शाळांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषदेकडून सर्व शाळांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यात 45 अनधिकृत शाळा आहेत आणि 4 नियमबाह्य शाळा आहेत. त्यापैकी 49 अनधिकृत शाळा या इंग्रजी माध्यमांच्या आहेत. या शाळांना नोटीस बचावण्यात आलेली आहे. त्यामुळे नोटिसीनंतरही शाळा सुरू राहिल्यास या शाळांना प्रत्येकी 1 लाख रुपयांचा दंड आकारला जाईल. त्यानंतर देखील शाळा सुरू राहिली तर प्रतिदिन 10 हजार रुपये असा दंड आकारला जाईल. दंडात्मक कारवाई नंतरही या शाळा सुरू राहिल्यास थेट फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार आहेत.
या 50 अनधिकृत शाळांमध्ये हजार पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भविष्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर कोणताही परिणाम होऊ दिला जाणार नाही. अधिकृत शाळांमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना आजूबाजूच्या शाळांमध्ये दाखल केले जाईल. विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होऊ दिले जाणार नाही, असे पुणे जिल्हा परिषदेचे संतोष पाटील यांनी स्पष्ट केले आहे.