विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसने आपल्या दोन उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. काँग्रेसने दोन्ही जागांवर मुंबईकरांना संधी दिली आहे.
मुंबई महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काँग्रेसने भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांच्या नावावर शिक्कोमोर्तब केलं आहे.
राज्यसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच विधान परिषदेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. येत्या २० तारखेला विधानपरिषदेची निवडणूक होत आहे. विधानपरिषदेच्या १० जागांसाठी ही निवडणूक होत आहे. अनेक दिग्गज नेते विधान परिषदेतून निवृत्त होत आहेत.
मुंबईतील ‘वेस्टीन हॉटेल’ इथे काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मंत्री अशोक चव्हाण, मंत्री सुनील केदार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी मुकुल वासनिक यांची स्वाक्षरी असलेले हंडोरे आणि भाई जगताप यांच्या उमेदवारीचं पत्रक काढण्यात आले आहे. चंद्रकांत हंडोरे यांनी मुंबईचे महापौरपदही भूषवले आहे. त्याशिवाय मागासवर्गीय घटकातील काँग्रेसचा चेहरा अशीही त्यांची ओळख आहे. तर, कामगार नेते असलेल्या भाई जगताप यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. काँग्रेसमधील आक्रमक चेहरा अशी त्यांची ओळख आहे.
विधानपरिषद निवडणुकीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष श्री.@Chandore_INC आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष श्री.@BhaiJagtap1 यांना काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. pic.twitter.com/1gVF8HbxWA
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) June 8, 2022
काँग्रेसकडून विधान परिषदेवर कोणाला संधी मिळणार याबाबत अनेक चर्चा सुरू होत्या. महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सचिन सावंत यांच्या नावाचीही चर्चा सुरू होती. काँग्रेसकडून मराठा आणि अनुसूचित जाती घटकातील उमेदवारांना संधी दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. संख्याबळानुसार काँग्रेसचा एक उमेदवार सहज विजयी होणार आहे. तर, दुसऱ्या जागेसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससह इतरांची मदत काँग्रेसला घ्यावी लागणार आहे.
विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपचे ४, राष्ट्रवादी-शिवसेना आणि काँग्रेसचे प्रत्येकी २ सदस्य निवडणूक जाऊ शकतात. मात्र आवश्यक संख्याबळ नसतानाही भाजपने पाचवा उमेदवार रिंगणात उतरवल्याने चुरस होऊ शकते.
संख्याबळ किती?
विधानससभेतील संख्याबळानुसार भाजपचे 4, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रत्येकी दोन, काँग्रेसचा एक आणि दहाव्या जागेसाठी पुन्हा भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये चुरस होऊ शकते. म्हणजे राज्यसभा निवडणूकीप्रमाणेच राज्याचं राजकारण तापण्याची शक्यता आहे. विधानपरिषदेवर निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीच्या 27 मतांची गरज उमेदवाराला असते. भाजपकडे मित्रपक्षांसह 113 आमदारांचे संख्याबळ आहे तर महाविकास आघाडीकडे एकूण 169 आमदारांचे संख्याबळ आहे. यापैकी राष्ट्रवादी काँग्रेसकडे 54, शिवसेनेकडे 56 तर काँग्रेसकडे 45 आमदार आहेत.