राजधानी नवी दिल्लीतून एक मोठी बातमी समोर आली असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमांमध्ये यापुढं सरकारी कर्मचाऱ्यांना सहभागी होता येणार आहे.
आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत असून त्याच दिवशी केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्यामुळे त्यावरून राजकीय खडाजंगी पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारच्या कार्मिक विभागाकडून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जारी करण्यात आलेल्या या आदेशानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना सहभाग घेण्यासाठी निर्बंध घालण्यात आलेल्या कार्यक्रमांच्या यादीतून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं नाव वगळण्यात आलं आहे. त्यामुळे आता सरकारी कर्मचारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ शकणार आहेत. ३० नोव्हेंबर १९६६, २५ जुलै १९७० व २८ ऑक्टोबर १९८० या तीन दिवशी जारी करण्यात आलेल्या सरकारी आदेशांचा उल्लेख या आदेशात करण्यात आला आहे
दरम्यान केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानही आपली भूमिका मांडली असून संघानं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही मागील 99 वर्षापासून राष्ट्र पुनर्निर्माणासाठी काम करत असून तत्कालीन काँग्रेस सरकारने राजकीय स्वार्थासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी प्रतिबंध केला होता. विद्यमान सरकार न घेतलेला निर्णय हा लोकशाही दृढ करण्यासाठी महत्त्वपूर्ण असल्याचं संघानं म्हटल आहे