मोठी बातमी ! संजय राऊतांच्या घरी ईडीचं पथक; ‘या’ घोटाळ्याप्रकरणी चौकशी सुरू

226 0

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या घरी आज सकाळीच ईडीचं पथक दाखल झालं आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी त्यांची चौकशी सुरू आहे.

ईडीचे काही अधिकारी आज सकाळीच राऊत यांच्या घरी पोहोचले. त्यांच्यासोबत सुरक्षा रक्षक आहेत. या सुरक्षा रक्षकांनी राऊत यांच्या घराबाहेर पहारा सुरू ठेवला असून कुणालाही आत जाण्यास मज्जाव करण्यात आलाय.ईडीचे 10 ते 12 अधिकारी संजय राऊत यांच्या घरी आहेत. तसेच सात ते आठ सीआरपीएफचे जवान आणि स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.राऊत आणि त्यांचे आमदार भाऊ सुनील राऊत हे दोघेही त्यांच्या भांडूप येथील ‘मैत्री’ बंगल्यात उपस्थित आहेत. पत्रावाला चाळ प्रकरणाशी संबंधित कागदपत्रांची ईडीची टीम चौकशी करत आहे.दरम्यान राऊतांच्या घरी ईडीचं पथक दाखल होताच शिवसैनिकांनी त्यांच्या घराबाहेर मोठी गर्दी केली आहे. त्यांचे समर्थक घोषणाबाजी करत आहे. संजय राऊत आप आगे बढो हम तुम्हारे साथ है, अशी घोषणाबाजी करताना हे शिवसैनिक दिसत आहेत.

ज्या प्रकरणामुळे सध्या संजय राऊत यांची चौकशी सुरू आहे, ते पत्राचाळ प्रकरण नेमकं काय आहे ते जाणून घेऊयात.

पत्राचाळ जमीन घोटाळा तब्बल 1,034 कोटी रुपयांचा असल्याचे बोलले जात आहे. याच प्रकरणात आता संजय राऊत यांची चौकशी सुरू आहे. मुंबईच्या गोरेगावमधील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र प्राधिकरण अर्थात म्हाडाचा एक भूखंड होता. हा भूखंड विकसीत करण्यासाठी प्रवीण राऊत यांच्या मालकीच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन या कंपनीला देण्यात आला होता. ठरलेला कराराप्रमाणे संबंधित कंपनीला या जागेवर तीन हजार फ्लॅटचे बांधकाम करायचे होते, त्यापैकी 672 हे भाडकरूंना तर उर्वरित फ्लॅट हे म्हाडा आणि कंपनी यांनी वाटून घ्यायचे होते. मात्र या प्रकरणात प्रवीण राऊत यांनी पत्राचाळमध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप ईडीच्या वतीने करण्यात याला आहे. याच प्रकरणात संजय राऊत यांची आज चौकशी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. ईडीकडून करण्यात आलेल्या दाव्यानुसार कराराचे पालन न करता आशिष कन्स्ट्रक्शन या कंपनीने या चाळीचा काही भाग हा खासगी बिल्डरांना विकला आहे. 2011, 2012 आणि 2013 मध्ये या भूखंडाचे अनेक भाग हे खासगी बिल्डरांना हस्तांतरित केल्याचा आरोप ईडीच्या वतीने करण्यात आला आहे.ईडीने यापूर्वी संजय राऊत यांना चौकशीला हजर राहण्यासाठी दोन समन्स बजावली होती. मात्र, संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे कारण देत संजय राऊत यांनी चौकशीला जाणे टाळले होते. त्यामुळे आता ईडीचे अधिकारी संजय राऊत यांच्या घरी पोहोचले आहेत. आता ईडीचे अधिकारी संजय राऊत यांना चौकशीसाठी आपल्या कार्यालयात नेणार का आणि त्यांना अटक करणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

 

 

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!