मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. जरांगे पाटलांनी सरकारला दिलेला अल्टिमेटम संपल्यामुळे ते पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. राज्यभरात देखील अनेक आंदोलक त्यांच्या आंदोलनाला समर्थन देत आहेत. आज त्यांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस असून आज सकाळीच मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालवल्याची मोठी अपडेट समोर आली. त्यामुळे मराठा समाजाची चिंता वाढली आहे.
मराठा समाजाला सरकारकडून स्वतंत्र आरक्षण देण्यात आले होते. मात्र आम्हाला स्वतंत्र आरक्षण नकोय, तर ओबीसी मधूनच आरक्षण मिळावे, या मागणीवर ठाम रहात जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. 20 जुलैला त्यांचे उपोषण पुन्हा सुरू झाले. आज या उपोषणाचा तिसरा दिवस असून आज सकाळीच त्यांची प्रकृती खालावली, असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. जरांगे पाटील यांची शुगर आणि रक्तदाब कमी झाल्यामुळे प्रकृती खालावली. याबाबत तात्काळ शासकीय आरोग्य विभागाच्या पथकाला माहिती देण्यात आली. या पथकाने जरांगे पाटील यांची तपासणी देखील केली.
जरांगे पाटलांनी सरकारला 13 जुलै पर्यंत ची मुदत दिली होती. त्यानंतर 20 जुलैपासून ते पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. या दरम्यान त्यांनी शांतता रॅली देखील महाराष्ट्रभरात काढली. त्याचबरोबर विधानसभेमध्ये 288 जागांवर उमेदवार उभे करण्याची घोषणा देखील त्यांनी केली आहे. त्याबाबत प्रत्येक मतदारसंघात चाचपणी सुरू असल्याचे सूत्रांची माहिती आहे. तर दुसरीकडे ओबीसी नेत्यांनी ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नाही, या मागणीसाठी मोठ्या आंदोलन उभे केले आहे. या पार्श्वभूमीवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे ओबीसी आरक्षण बचाव जन आक्रोश यात्रा काढणार आहेत. या यात्रेची सुरुवात मनोज जरंगे पाटील ज्या गावात उपोषणाला बसले आहेत त्याच अंतरवाली सराटी गावाजवळ असलेल्या दोधड या गावाजवळून होणार आहे. त्यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाचा वाद दिवसेंदिवस चिघळत चालला आहे.