crime in pune school (not real image)

PUNE CRIME: नववीतील विद्यार्थ्याने वर्गातच चिरला दुसऱ्या विद्यार्थ्याचा गळा; धक्कादायक कारण आलं समोर

513 0

शाळेत झालेल्या किरकोळ वादातून एका विद्यार्थ्याने वर्गातच दुसऱ्या विद्यार्थ्याचा गळा चिरल्याची (Pune crime) धक्कादायक घटना पुण्यातून समोर आली आहे. ही घटना नववीतील विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या वादातून घडली असून आरोपी विद्यार्थ्याने काचेच्या तुकड्याने पीडित विद्यार्थ्यांचा गळा चिरल्याची माहिती समोर आली आहे.

नेमकं प्रकरण काय ?

पुण्यातील हडपसर भागातील मांजरी परिसरातील एका शाळेतील ही घटना आहे. या घटनेत 15 वर्षीय मुलगा जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर याप्रकरणी नववीत शिकणाऱ्या 14 वर्षीय मुलावर हडपसर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मांजरीतील या शाळेत वार्षिक स्नेहसंमेलनाच्या आयोजनावरून दोन विद्यार्थ्यांमध्ये वाद झाले होते. हे दोन्ही विद्यार्थी नववीत शिकत असून मंगळवारी दुपारी दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास पीडित मुलगा हा वर्गात बसलेला असताना आरोपी मुलाने अचानक मागून येऊन या विद्यार्थ्यावर हल्ला केला. हातात असलेल्या काचेच्या तुकड्याने त्याच्या गळ्यावर वार केले. एवढ्यावरच न थांबता हा मुलगा पीडित मुलाला जीवे मारण्याची धमकी देत होता.

या घटनेत पीडित मुलगा गंभीर जखमी झाला असून घटनेची माहिती मिळताच तात्काळ शिक्षकांनी मुलाला रुग्णालयात दाखल केले. याप्रकारणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी 14 वर्षीय मुलाला ताब्यात घेतले आहे. तर हडपसर पोलिसांकडून घटनेचा संपूर्ण तपास सुरू आहे.

Share This News
error: Content is protected !!