नुकतंच पुण्यामध्ये एका व्यवसायिकाची अपहरण करून त्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. त्यानंतर आता प्रसिद्ध बैलगाडा मालकाचा अपहरण करून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. नवलाख उंब्रे येथील प्रसिद्ध बैलगाडा मालकाचे अपहरण करून खून करण्यात आला. मात्र या खूनाच्या मागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
ही घटना गुरुवार 21 नोव्हेंबर रोजी उघडकीस आली असून पंडित रामचंद्र जाधव (वय 48, रा. जाधववाडी, नवलाख उंब्रे, ता. मावळ, पुणे) असे खून झालेल्या बैलगाडा मालकाचे नाव आहे. बैलगाडा मालक पंडित जाधव यांच्याकडे मॉगी नावाचा बैल आहे. त्याने अनेक शर्यतींचं मैदान मारलं आहे. त्यामुळेच जाधव हे बैलगाडा मालक म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध होते.
मिळालेल्या माहितीनुसार, पंडित जाधव यांचं 14 नोव्हेंबर रोजी अज्ञातांनी अपहरण केलं. हे अपहरण खंडणीसाठी करण्यात आलं होतं. त्यानंतर आरोपींनी 50 लाख रुपयांची खंडणी मागितली गेली. मात्र त्यानंतर आरोपींनी जाधव यांचा निर्घृण खून केला व पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळला.
याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून खंडणी विरोधी पथकाने संशयित आरोपी सुरज वानखेडे याला ताब्यात घेतलं आहे. मात्र आरोपींनी जाधव यांचा खून का केला याचा तपास अद्याप लागलेला नाही. पुढील तपास तळेगाव एमआयडीसी पोलिसांकडून केला जात आहे.