पुण्यातील कोंढवा परिसरातील इमारतीला भीषण आग; एका महिलेचा मृत्यू तर अनेक जण गंभीर जखमी
पुण्यातील कोंढवा परिसरातील एका इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या भीषण आगीत एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एक पुरुष गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली.
पुण्यातील कोंढवा परिसरातील एनआयबीएम रोडवर असलेल्या एका आलिशान सोसायटीत ही घटना घडली. या सोसायटीच्या वरच्या दोन मजल्यावर आग लागली होती. या घटनेची माहिती मिळताच तात्काळ अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. आग विझवण्यासाठी पाण्याचे चार बंब पाठवण्यात आले. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर ही आग विझवण्यात जवानांना यश आलं. मात्र या आगीत एक महिला आणि एक पुरुष गंभीर जखमी झाले होते. दोघेही आगीत गंभीररित्या भाजलेले असल्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. स्थानिक नागरिकांनी या इमारतीतील नागरिकांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले. या आगे मध्ये जखमी असलेल्या नागरिकांची संख्या जास्त असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.