काही दिवसांपासून उत्तराखंड मधील भूस्खलनाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याच भूस्खलन झालेल्या ठिकाणी पुण्यातील 52 प्रवासी अडकून पडले आहेत. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय चिंतीत आहेत.
काही दिवसांपूर्वी चारधाम यात्रेसाठी पुण्यातील 52 प्रवासी 28 जूनला निघाले होते. चारधाम ची यात्रा संपून दहा ते अकरा तारखेला ते पुण्यात परतणार होते. मात्र यात्रेमधील शेवटचे देवस्थान असलेल्या बद्रीनाथ मध्ये दर्शन घेतल्यानंतर परतताना मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाल्याने हे सर्व प्रवासी बद्रीनाथ जवळच असलेल्या गोविंद घाट परिसरात अडकले आहेत. भूस्खलन झाल्याने राष्ट्रीय महामार्ग बंद झाला आहे. त्यामुळे या प्रवाशांना प्रतिसाद प्रवास सुरू करता येत नसल्याशिवाय माहिती समोर आली आहे.
मंगळवारपासून म्हणजेच तब्बल तीन दिवस हे नागरिक याच ठिकाणी अडकून पडले आहेत. त्यांच्यावर चक्क उपासमारीची आणि रस्त्यावर झोपण्याची देखील वेळ आली. त्याचबरोबर या प्रवाशांमध्ये काही ज्येष्ठ नागरिक आहेत ज्यांची प्रकृती खालावत असून सोबत नेलेल्या औषधांचा साठा देखील संपला आहे. अशी माहिती या 52 प्रवाशांपैकी एक असलेले विशाल धुमाळ यांनी दिली आहे.
दरम्यान काल पासून जवळच असलेल्या गुरुद्वारा मधून या नागरिकांसाठी फूड पॅकेट येत आहेत. त्याचबरोबर त्यांच्या राहण्याची तात्पुरती व्यवस्था झाली आहे. मात्र तरीही अनेक जणांची औषधे संपल्यामुळे तसेच मोबाईलला नेटवर्क नसल्यामुळे घरच्यांशी संपर्क होत नाही, ज्यामुळे हे नागरिक आणि त्यांचे कुटुंबीय चिंतेत आहेत. दरम्यान या सगळ्या प्रकरणाचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे घेत आहेत. या नागरिकांना परत आणण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाशी संपर्क केला असून बंद झालेला हा महामार्ग शुक्रवार ( दि. 12 ) पर्यंत खुला होण्याची शक्यता आहे. मात्र तसे न झाल्यास प्रशासकीय पातळीवर नियोजन करून नागरिकांना परत आणण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.