वर्षभरापूर्वी पुण्यातील प्रसिद्ध सारसबागेच्या परिसरात काही मुस्लिम व्यक्तींनी नमाज पठण केले होते. याप्रकरणी आता पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.
नेमकं प्रकरण काय ?
पुण्यातील सारसबाग हे उद्यान पुणे महानगरपालिकेच्या ताब्यात आहे. सारसबागेत प्रसिद्ध गणपती मंदिर या मंदिराच्या मागच्या बाजूला असलेल्या लॉन्स वर पाच ते सहा अनोळखी मुस्लिम व्यक्तींनी 5 मे 2022 रोजी सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास नमाज पठण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या मुख्य उद्यान अधीक्षकांच्या आदेशाचे उल्लंघन करत गैर कृत्य केल्याप्रकरणी आता स्वारगेट पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस हवालदार संदीप भास्कर गोडसे यांनी फिर्याद दिली होती.
दरम्यान, याप्रकरणी भांदवी 295(अ), 188, 143, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 37(1) (ई) सह 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी इतर समाजाच्या भावना दुखावून जातीय तेढ निर्माण होईल, अशा प्रकारचे कृत्य केल्यामुळे हे गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.