ATM CARD ROBBERY PUNE: सावधान! ज्येष्ठ नागरिक एटीएम चोराच्या रडारवर; 14 लाखांची कॅश आणि 166 एटीएम कार्ड जप्त

ATM CARD ROBBERY PUNE: सावधान! ज्येष्ठ नागरिक एटीएम चोराच्या रडारवर; 14 लाखांची कॅश आणि 166 एटीएम कार्ड जप्त

574 0

पुण्यात एका अट्टल एटीएम चोराचा पर्दाफाश करण्यात आलाय. या चोराच्या रडारवर पेन्शन चालू असणारे ज्येष्ठ नागरिक होते. केवळ एका गुन्ह्याचा तपास करत असताना या चोराने या आधी केलेले अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत. त्याच्याकडे एक-दोन नाही तर तब्बल 166 एटीएम कार्ड ( ATM CARD ROBBERY ) सापडलेत. आणि जो आरोपी जवळपास चार वर्ष पोलिसांना सापडत नव्हता त्याला पकडण्यात अखेर विश्रामबाग पोलिसांना (vishrambaug police)यश आलंय. त्यामुळे तुम्ही एटीएम मधून पैसे काढत असाल तर सावधानता बाळगणं गरजेचं आहे.

राजू प्रल्हाद कुलकर्णी, असं या 54 वर्षीय आरोपीचं नाव आहे. तो मूळचा म्हैसूरच्या नेताजी नगर मध्ये राहणारा.. तो पुण्यात येऊन एटीएम चोऱ्या करायचा. 2021 मध्ये त्याच्यावर पहिला गुन्हा दाखल झाला. ज्या एटीएम मध्ये पेन्शनर ज्येष्ठ नागरिक येतात, त्या ठिकाणी तो लक्ष ठेवून असायचा. अंदाजे ज्या तारखेला पेन्शन जमा होते, त्यादरम्यान तो एटीएम ची रेकी करायचा. ज्येष्ठ नागरिक दिसल्यास त्यांना एटीएम मधून पैसे काढायला मदत करतो असं सांगून बोलण्यात गुंतवायचा. त्यांच्याकडून एटीएम चा पिन मागून घ्यायचा. त्यानंतर अगदी शिताफिने एटीएम चोरून तिथून पसार व्हायचा. चोरलेलं एटीएम कार्ड वापरून दुसऱ्या एटीएम मशीन मधून तो पैसे काढायचा. आणि पैसे घेऊन थेट म्हैसूर ला जायचा. हा त्याचा नित्याचा क्रम होता. पुण्यात चोरी केलेले पैसे गावी नेऊन उदरनिर्वाह करायचा. पैसे संपल्यावर पुन्हा पुण्यात यायचा. या सगळ्यामुळेच पुणे पोलिसांना आतापर्यंत त्याच्यापर्यंत पोहोचण्यात यश आलं नव्हतं. त्याच्यावर आतापर्यंत विश्रामबाग, बिबवेवाडी, सहकारनगर, कोथरूड, आळंदी, भोसरी, लष्कर, शिवाजीनगर, भारती विद्यापीठ आणि सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्याच्या चौकशीतून तब्बल 16 गुन्हे उघडकीस आले आहेत. त्याने आत्तापर्यंत 17 लाख 92 हजार 900 रुपये एटीएम मधून काढले आहेत. त्यापैकी त्याच्याकडून तब्बल 14 लाख 90 हजार सहाशे रुपयांचे रोख रक्कम हस्तगत करण्यात आली असून वेगवेगळ्या बँकांचे 166 एटीएम कार्ड हस्तगत करण्यात आलेत. याचा संपूर्ण तपास पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला.

Share This News
error: Content is protected !!