माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाच्या कथित अपहरण नाट्य प्रकरणाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. सावंत यांच्या मुलाने चार्टर्ड विमानाने बँकॉकला जाण्यासाठी तब्बल 68 लाख रुपये खर्च केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे हे चार्टर्ड विमान ही आता चर्चेत आलं आहे. पण हे चार्टर्ड प्लेन म्हणजे नेमकं काय असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. चार्टर्ड प्लेन काय आहे? या प्लेनने कधीही, कुठेही जाता येतं का? कमर्शियल फ्लाइट्सच्या तुलनेत त्याचा खर्च किती येतो? चार्टर्ड प्लेनमध्ये मिळणाऱ्या सुविधांपासून ते त्यावर होणाऱ्या खर्चाबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट पाहूयात.
कमर्शियल फ्लाईट्सच्या तुलनेत चार्टर्ड प्लेनचा खर्च अनेक पटींनी जास्त असतो. तुम्ही जर सेकंड हँड प्रायव्हेट जेट खरेदी करायला गेलात तर तुम्हाला ३ मिलयन डॉलर्सपर्यंत खर्च करावा लागू शकतो. पण जर तुम्ही नवीन प्रायव्हेट जेट खरेदी करत असाल तर तर तुम्हाला किमान ५ मिलियन डॉलर्स इतका खर्च करावा लागेल. आणि समजा तुम्हाला प्रायव्हेट जेट भाड्याने घ्यायचं आहे. तर तुम्हाला एका तासाला १.५ ते २ लाख रुपये मोजावे लागतील. म्हणजेच तुम्ही जर एका दिवसाचे ६ तास प्रायव्हेट जेट भाड्याने घेऊन फिरलात तर तुम्हाला किमान ९ ते १२ लाख रुपये इतका खर्च करावा लागेल. तानाजी सावंतांचा मुलगा आपल्या मित्रांसोबत चार्टर्ड प्लेनने बँकॉकला निघाला होता. त्यासाठी तब्बल 68 लाख रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती आहे. मग आता तानाजी सावंत यांच्या मुलाने किती तासासाठी चार्टर्ड प्लेन घेतले असेल याचा हिशोब ऋषिराज सावंत यांनाच माहीत. कमर्शियल फ्लाईट बुक केली असेल तर दिल्लीहून मुंबईला येण्याचा खर्च एक लाख रुपयांपर्यंत जातो. पण जर तुम्हाला खासगी जेटने प्रवास करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला किमान 10 लाख रुपये खर्च करावे लागतील. चार्टर्ड प्लेन मध्ये अनेक सोयी सुविधा मिळतात. एकाच दिवसात अनेक ठिकाणी प्रवास करणं देखील सोपं असतं. तसेच तुम्ही येण्याजाण्याची वेळ स्वतः ठरवू शकता. पण त्यासाठी तुम्हाला केवळ विमानतळ प्रशासनांची परवानगी घ्यावी लागते.