उत्तरप्रदेशच्या प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा सुरु आहे. जगभरातील लोक महाकुंभ मेळाव्यात दाखल होत असतात. हा कुंभमेळा अनेक कारणांनी चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वीच कुंभमेळ्यात आगीची घटना घडली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा कुंभमेळाव्यात अग्नितांडव पाहायला मिळालं. महाकुंभ मेळ्याच्या बाहेरील बाजूस बांधलेल्या टेंट सिटीमध्ये भीषण आग लागली. झुंसी येथील छतनाग घाटातील नागेश्वर घाट सेक्टर २२ जवळ आग लागल्याची माहिती आहे. या आगीत सुमारे १५ तंबू जळून राख झाले आहेत. महाकुंभ मेळ्यादरम्यान दुपारी लागलेल्या या आगीत कोणतीही जीवितहानी झाली. १५ तंबूंना आग लागल्याची माहिती पोलिसांनी दिली. तर रस्ता चांगला नसल्याने घटनास्थळी पोहोचायला थोडा वेळ लागला असल्याचही त्यांनी सांगितल. हे मंडप परवानगीशिवाय उभारण्यात आल्याच समोर आल असून ही माहिती जवळच्या पोलीस ठाण्यात कळवण्यात आली. याआधी २० जानेवारीलाही महाकुंभमेळ्यादव्यात भीषण आग लागल्याची घटना घडली होती. यामध्ये गीता प्रेसच्या छावणीसह मोठ्या प्रमाणात तंबू जळून खाक झाले होते. त्यानंतर काही जण जखमी झाल्याचीही माहिती समोर आली आहे. तर नुकतंच चेंगराचेंगरीची घटना घडल्याने देखील लोकांमध्ये खळबळ उडाली होती. आता लागलेल्या आगीवर अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत नियंत्रण मिळवले आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
